मॅट्रिमोनी साईट्सवरुन उच्चशिक्षित तरुणींची फसवणूक, आरोपीला अटक

लग्नासाठी मॅट्रिमोनी साईट्सवर स्थळ बघताना सावधान

Updated: Jan 18, 2020, 09:55 PM IST
मॅट्रिमोनी साईट्सवरुन उच्चशिक्षित तरुणींची फसवणूक, आरोपीला अटक

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : तुम्ही लग्नासाठी मुलाच्या शोधात असाल आणि जर कोणत्या वेबसाईटवर तुम्ही एखादा अर्ज समाविष्ट केला आणि कोणाची मागणी आली तर तुमची फसवणूक तर होत नाही ना? यांची काळजी घ्या. आज लग्नासाठी अनेक वेबसाईटवर सुरु झाल्या आहेत. पण याच वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक ही वाढली आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय तरुणाने आपण आयएएस अधिकारी असल्याचे भासवून मुलीची फसवणूक केली आहे.

एका युवकाने तरुणीला खोटी माहिती देऊन तिचं शारीरिक शोषण आणि लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीनंतर या तरुणाला पोलिसांनी पनवेलमधून अटक केली आहे.

आदित्य म्हात्रे असं या आरोपीचं नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून त्याने लग्नासाठी आपला फोटो आणि बायोडाटा या वेबसाईट्सवर अपलोड केला होता. कधी प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर तर कधी IPS अधिकारी अशा प्रकारे खोटी माहिती देत हा मुलींची फसवणूक करत होता. त्याच्या सोबत लग्न करण्यासाठी ३० महिलांनी त्याला संपर्क देखील केल्याचं समोर आलं आहे. याच तरुणाने पुणे येथील एका महिलेला पाच लाखांचं बँकेचं लोन देण्याचे आमिष दाखवून फसवले आहे. यावरच तो थांबला नाही तर एका निवृत्त पोलीस उपायुक्तांच्या डॉक्टर असलेल्या मुलीलाही 70 हजाराची फसवणूक याने केली आहे.

नंतर या तरुणी जेव्हा त्याला फोन करायच्या तर याचा फोन बंद लागत असे. एका डॉक्टर महिलेने दिंडोशी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दिंडोशी पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. पण दोन महिन्याच्या तपासानंतर त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आलं. लग्नासाठी अशा वेबसाईटवरुन स्थळ बघताना सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा कोणाचीही फसवणूक होऊ शकते.