उद्या यंदाची १७वी मुंबई मॅरेथॉन; ५५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार

कडाक्याच्या थंडीत उद्या मुंबईकर रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. निमित्त आहे अर्थातच मुंबई मॅरेथॉनचं...

Updated: Jan 18, 2020, 08:21 PM IST
उद्या यंदाची १७वी मुंबई मॅरेथॉन; ५५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईत सध्या कडाक्याची थंडी पडली असून या कडाक्याच्या थंडीत उद्या मुंबईकर रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. निमित्त आहे अर्थातच मुंबई मॅरेथॉनचं... ही यंदाची सतरावी मुंबई मॅरेथॉन आहे. मॅरेथॉनमध्ये ५५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 

गुलाबी थंडी आणि वाहणारे बोचरे वारे यांचा सामना करत रविवारी मुंबईकर आणि अव्वल धावपटू मुबंई मॅरेथॉनमध्ये धावतील. मुंबई मॅरेथॉनला मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा वर्षागणिक रोडावत असला तरी दरवर्षी स्पर्धकांची संख्या मात्र वाढत आहे. यंदाही स्पर्धकांच्या संख्येत तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

यंदा ५५ हजारांहून अधिक स्पर्धक मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतील. एकूण ७ गटांमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. अव्वल धावपटूंसाठी ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, ४२ किलोमीटरची हौशी धावपटूंसाठी पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन, १० किलोमीटरची शर्यत, दिव्यांगांसाठी १ किलोमीटरची शर्यत, वरिष्ठांसाठी ५ किलोमीटरची शर्यत, तर ६ किलोमीटरची ड्रिम रन अशा सात गटांमध्ये या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही केनियन धावपटूंच मुंबई मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. तर भारतातील टॉपचे धावपटूही आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतील. यात नेमकं कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.