close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास!

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.

Updated: Aug 28, 2017, 02:26 PM IST
नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास!

मुंबई : लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.

त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री’ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.

841

मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे

त्या काळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. १९४६ साली `श्री’ ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. इ.स. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात `श्री’ ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. १९४८ महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आले. इ.स. १९४७ सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा साहजिकच बदलण्यात आली. आता मंडळाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिलकी निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले.

God-Ganesh-lalbaugcha-raja-2014-images-1366x768

इ.स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश’ आणि `कालियामर्दन’ हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म. ल. पाटील, ना. गणपतराव तपासे, ना. गोविंदराव आदिक, ना.मालोजी निंबाळकर, म्यु.कार्पोरेटर डॉ.नरवणे, नवाकाळचे सहसंपादक गोविंदराव महाशब्दे, प्रकाशचे वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे श्री. गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे यांची व्याख्याने झाली.

pn01lalabaugcha-raja16

उत्सवाला जत्रेचे स्वरुप

इ.स. १९५८ सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची रीघ वाढत चालली. उत्सवाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. इ.स. १९४८ ते इ.स. १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या. श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रौ पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक. या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तिंचा आदर सत्कार करण्यात येतो. ही प्रथा आजतागायात चालू आहे. तसेच दर्शनोत्सुक भाविकांची व्यवस्था करण्यासाठी विविध मंडळाची जागरण पद्धत सुरु केली. त्याच कालावधीत विभागातील गणेशोत्सव मंडळाबरोबरच कुंभारवाडा, दुर्गादेवी, डंकनरोड, नवी अमृतवाडी, कामाठीपुरा, खेतवाडी या गणेशोत्सव मंडळांशी देखील जिव्हाळयाचे संबंध प्रस्थापित केले ते पुढे दृढ होत गेले व यापुढे आणखी दृढ होत जातील याबद्दल शंका नाही.

कार्यकर्त्यांची नवीन पिढी

lalbaugcha-raja1

इ.स. १९६९ साली कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्माण झाली. वसंतराव भोसले यांचे दमदार नेतृत्व मंडळाला लाभले. त्यांना ऍड. नागेश पवार, का. सि. महाडिक, मदन कडू, दत्ताराम दळवी, सखाराम आंबे, रमेश चव्हाण, सिताराम साळवी, चंद्रकांत खाडये, जयप्रकाश कोरगांवकर यांची साथ लाभली. त्यांच्याच नेतृत्वाखाली मंडळाने नव्या कार्याची उभारणी केली. मंडळाचा कार्यव्याप वाढत चालला होता. त्याकरीता स्वतंत्र कार्यालयाची गरज भासू लागली. इ.स. १९७० साली हनुमान मंदीराचा जिर्णोध्दार करावा असे ठरले. इ.स. १९७१ साली जिर्णोध्दारास सुरुवात होऊन इ.स. १९७३ साली मंदीर नवीन स्वरुपात बांधले गेले व तेथेच एका सुबक कार्यालयाची देखील निर्मिती केली गेली. इ.स. १९७५ साली भवानी मातेची मंदीरात कायमस्वरुपी स्थापना करून त्याच ठिकाणी नवरात्रौत्सव साजरा करण्यात येऊ लागला.

व्याख्यानमालेस पुनश्च प्रारंभ

इ.स. १९८२ सालापासून रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमालेस पुनश्च प्रारंभ झाला. तसेच वाचनालय सुरु करण्यात आले. इ.स. १९८३ साली मंडळाने ५० वर्षे पूर्ण केली. यावेळी मंडळाने सात घोड्यांच्या रथात बसलेली सूर्यनारायणरुपी गणेशमूर्तिची स्थापना केली होती. तसेच मागील एकोणपन्नास वर्षात झालेल्या गणेशोत्सवातील देखाव्याचे हुबेहुब प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन भाविकांचे आकर्षण झाले होते. सुवर्णमहोत्सवी वर्षांचे अध्यक्षपद चंद्रकांत खाडये यांनी भुषविले होते तर सरचिटणीस व खजिनदार म्हणून वसंतराव भोसले व मारुती तळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. पानसुपारी समारंभात सुवर्णमहोत्सवा निमित्त माजी कार्यकर्त्यांचा व हितचिंतकांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Lalbaugcha-Raja-Visarjan

नव्या पिढीने मंडळाचा कार्यभार घेतला हाती

इ.स. १९८४ पासून पुन्हा एकदा नवीन पिढीने मंडळाचा कार्यभार हाती घेऊन मागील पिढीने सुरु केलेले कार्य जोमाने पुढे चालू ठेवले. त्यात सर्वश्री रमेश चव्हाण, अशोक पवार, सुभाष सायले, रमेश बोधे, सूर्यकांत मांडवकर, मनोहर पवार, सिताराम नकाशे यांचा सिंहाचा वाटा होता. इ.स. १९८४ साली नवरात्रौत्सव रौप्य महोत्सव दिमाखात साजरा केला. इ.स. १९८४ ते १९९३ या दशकात अनेक विधायक कामे केली. कोकण पूरग्रस्त निधीस पंधरा हजार रुपयांची देणगी दिली. इ.स. १९९० साली स्थानिक लोकांच्या गृहनिर्माण समस्या सोडविण्यात पुढाकार घेऊन तत्कालीन महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्याने ७२ गाळयांच्या इमारतीचे रेंगाळलेले बांधकाम पूर्ण करून घेतले. भारत पाकिस्तान कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढणाऱया भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी `आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंडा’करिता रु. १ लाखाचा धनादेश महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचेकडे सुपूर्द केला. तसेच नेत्र शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर यांसारखी शिबिरे लोकांकरिता आयोजित केली.