मुंबई : समाजात तेढ निर्माण करणा-यांवर पोलीस कारवाई करतील, असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला होता. त्याबाबत विचारणा केली असता गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी भोंगे लावत हनुमान चालिसा लावला होता. काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत भोंगे काढले. पण यानंतर राज्यात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेच्या शाखा अध्यक्षांसह इतर मुस्लीम पदाधिका-यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केलीय. तसच या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा लावू असंही म्हंटलंय. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिका-यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान मनसेच्या नवनिर्वाचित प्रवक्त्यांची मंगळवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत बैठक होणार आहे. राज ठाकरे या नवनिर्वाचित प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.