'राज्य संकटात असताना भाजपला 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना सुचतेच कशी?'

स्वत:च्या घराच्या अंगणालाच 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाही.

Updated: May 20, 2020, 08:46 PM IST
'राज्य संकटात असताना भाजपला 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना सुचतेच कशी?' title=

मुंबई: राज्य संकटात असताना भाजपला 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना सुचतेच कशी, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपकडून येत्या २२ तारखेला राज्य सरकाराच निषेध करण्यासाठी 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी भाजपचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, स्वत:च्या घराच्या अंगणालाच 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त करोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे.

'फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट'

अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपाचं काहीही भलं होणार नाही. उलट त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळा निर्माण होईल. त्यामुळे आता जनताच महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा हा डाव हाणून पाडेल, असे अजित पवार यांनी म्हटले. त्याऐवजी भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे. महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

...म्हणून राज्य सरकार आर्थिक पॅकेज देत नाही; जयंत पाटलांचे भाजपला प्रत्युत्तर

राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत भाजपने येत्या २२ तारखेला 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाची हाक दिली आहे. कोरोना राज्यात येऊन ६० दिवस उलटले. तरीदेखील राज्य सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे २२ मे रोजी सकाळी ११ वाजता जनतेने हे आंदोलन करून आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.