मुंबई: गेल्या काही काळात विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना भाजपने स्वत:च्या गोटात सामील करू घेतले आहे. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावरून एक मजेशीर किस्सा घडला.
एक काळ असा होता की, काँग्रेसने सातत्याने विरोधी पक्षातील नेते फोडून त्यांना मंत्री केले. आज त्यांचं राजकारण त्यांच्यावर उलटवताना तुम्हाला शरद पवारांपेक्षा जास्त पॉवरफुल झाल्यासारखं वाटतं का, असा प्रश्न एका पत्रकाराने फडणवीस यांना विचारला.
या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मुख्यमंत्र्यांनीही हे कौतुक होते का अजून काही?, असा प्रतिप्रश्न करत हसायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी म्हटले की, मी जीवनात कधीच कुठलं राजकारण केलं नाही. त्यामुळे प्यादाला प्यादा लढवणं, वजीर किंवा उंट चालवणं, ही माझ्या राजकारणाची पद्धत नाही. त्यामुळे मी कधीही कोणापेक्षा पॉवरफुल आहे, झालोय किंवा होईन, असे मला वाटत नाही. मी नेहमी सकारात्मक निर्णय घेण्याचे राजकारण केले. त्यामध्ये अनेक लोक जोडत गेली, असे फडणवीस यांनी म्हटले.
आम्ही कोणालाही फोडले नाही. तुमच्या पक्षातील लोक तुमच्यासोबत राहायला का तयार नाहीत, याचे उत्तर द्या. त्यांचा नेतृत्त्वावर विश्वास उरलेला नाही. अन्यथा कोणताही नेता अशाप्रकारे फुटत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.