अमित जोशी, झी २४ तास, मुंबई: युती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर खाते वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांना झटका दिला आहे.गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेले शालेय शिक्षण खाते हे विनोद तावडे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. हे खाते नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले.
तर विरोधी पक्षनेते असताना एम पी मिल कंपाऊंड एसआरए प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप करून प्रकाश मेहता यांचा राजीनामा मागणारे विखे पाटील यांच्याकडेच मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण खात्याची धुरा सोपवली आहे.
सुभाष देशमुख यांच्याकडचे पणन हे महत्वाचे खाते काढून घेत ते राम शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे.
'तो' घोटाळा दडपण्यासाठी विखेंना कॅबिनेट मंत्रिपद- अजित पवार
फडणवीस सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे वजनदार मंत्री चंद्रकांत पाटील यांचा भार काहीसा हलका करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेले कृषी खाते हे अपेक्षेप्रमाणे डॉ अनिल बोंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर अपेक्षेप्रमाणे अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास खात्याचा भार देण्यात आले.
आरपीआय गटाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्याकडे सामाजिक न्याय खाते देण्यात आले आहे. तर भाजपाकडे असलेले जलसंधारण खाते हे शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्याकडे दिले गेले आहे. तसेच रोजगार हमी आणि फलोत्पादन ही भाजपाकडे असलेली खाती शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना मिळाली आहेत.
राजभवनात रविवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे १०, शिवसेनेचे २ तर रिपाईचा एक अशा १३ नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.