मुंबई : कोरोना स्थितीवरून राज्य सरकारला रोज टीकेचं लक्ष करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमैया यांनी आता क्वारंटाईन सेंटरमधील कंत्राटात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे. मुंबईतील क्वारंटाईन सेंटर्सची कंत्राटं मिळवण्यासाठी स्पर्धा लागली असून यामध्ये कंत्राटदार मालामाल होत असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.
वेगवेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदारांना वेगवेगळे दर आकारण्यात येत असल्याची माहिती सोमैया यांनी दिली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना दोन वेळचे जेवण, चहा, नास्त्यासाठी कंत्राट दिले असले तरी यासाठी वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत, असं सोमैया यांचं म्हणणं आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरात १७२ रुपये, दादर-धारावीसारख्या परिसरात ३७२ रुपये, अंधेरी-जोगेश्वरी भागात ३५० रुपये आणि ठाण्यात ४१५ रुपये इतका दर आकारण्यात येत असल्याचं सोमैया यांचं म्हणणं आहे.
हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण असलं तरी त्याही परिस्थितीत खाबूगिरी सुरु असल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे.
क्वारंटाईन सेंट्रमधील जेवण्याचा दर्जा सुमार असल्याने रुग्णांना त्रास होत आहे, तर दुसरीकडे कंत्राटदारांची चलती सुरु आहे, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.
क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना का कमिशन अशा शब्दात सोमैया यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सोमैया यांच्या या आरोपांनंतर ठाकरे सरकारकडून खुलाशाची अपेक्षा आहे.