मुंबई : एकीकडे शिवसेना आक्रमक झाली असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. तीन वर्षे भाजप आणि दोन वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याच्या प्रस्तावाबाबत आपण शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. आपण भाजप नेत्यांशी लवकरच याबाबत चर्चा करू असे ते म्हणाले. आपण मांडलेला प्रस्ताव संजय राऊत यांना मान्य आहे. त्यामुळे याआता पुढची पायरी म्हणून आपण यासंदर्भात भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहे.
दरम्यान, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये दरी पडली आणि युती तुटली. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. याच मुद्द्यावरुन रामदास आठवले यांनी आपण संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात युतीचे सरकार येण्यासाठी आपण तडजोड करण्यासंबंधी मी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना तीन वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला सांगितला. त्यांना हा फॉर्म्युला पटला आहे. त्यांनी तो मान्य करण्यास ते तयार असतील तर आपण विचार करु शकतो, असे सांगितले, असा दावा आठवले यांनी करत मी भाजपाशी यासंबंधी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
त्याआधी रामदास आठवले यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. पाच वर्षे एकाच पक्षाचा मुख्यमंत्री हवा, असेही म्हटले होते. त्यामुळे आता त्यांनी यावर माघार घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यात महायुतीला लोकांचा जनादेश मिळाला आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा एकच मुख्यमंत्री हवा ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचाही पाठिंबा आहे, असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. आता आठवले यांचा हा प्रस्ताव भाजप मान्य करणार का, याची उत्सुकता आहे.