मी विचारधारा बदललेली नाही, त्यामुळे हे शिवधनुष्य पेललेले आहे - उद्धव ठाकरे

'मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे.'  

Updated: Jun 19, 2020, 02:28 PM IST
मी विचारधारा बदललेली नाही, त्यामुळे हे शिवधनुष्य पेललेले आहे - उद्धव ठाकरे title=
संग्रहित छाया

मुंबई : मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. वादळामागूनी वादळं आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवन येथे शिवसेने च्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच  एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचे कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, उद्धव ठाकरे म्हणालेत. 

जे आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, त्या तिडीकीतून मुख्यमंत्री झालो. शिवसेनेवर अन्याय होत असताना शिवसेना कशी गप्प बसेल, मैत्री करून विश्वास ठेवला पण विश्वास ठेवणे, ही आमची कमजोरी नाही. विश्वावसघात करत असेल तर लाचारी स्विकारणार नाही, त्यामुळे हे शिवधनुष्य पेललेले आहे, असा टोला भाजपला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

'मला पंतप्रधान बनायचे नाही'

मला काही पंतप्रधान बनायचे नाही. मात्र, माझा शिवसैनिक त्या पदावर पोहोचला पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणालेत चीन संकटाबद्दल पंतप्रधान यांनी व्हीसी आयोजित केलीय. देशावर संकट आला तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आहे. देशावरती चीन नावाच संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता माननीय पंतप्रधान यांच्यासोबत मिटींग आहे. हिमालयाच्या संकटाला सुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आपण शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे.  विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही. शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही !

मुंबईही रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक. आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही.मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आले. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिवसैनिकांना दिले.

 शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने

कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जसे की , मास्क, पी पी ई किट, हॅन्ड ग्लोज.  जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. वादळ येऊ चक्रीवादळ येऊ कोणतंही संकट येऊ तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही.  अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.