शत्रूचा थरकाप उडवणारी, भारताचा समुद्रातला नवा शहनशाह...विक्रांत

भारतीय नौदलाच्या नव्या शानदार विक्रांतची बांधणी पूर्ण  झाली असून खोल समुद्रातल्या चाचण्या काही महिने चालणार आहेत

Updated: Aug 5, 2021, 09:51 PM IST
शत्रूचा थरकाप उडवणारी, भारताचा समुद्रातला नवा शहनशाह...विक्रांत

मुंबई : विक्रांत... भारतीयांचा अभिमान...शत्रूलाही हे नाव चांगलंच माहितीय... इतिहास घडवणाऱ्या या नावाने कोची शिपयार्डमध्ये भारतीय नौदलाच्या नव्या शानदार विक्रांतची बांधणी पूर्ण झालीय. विक्रांत म्हटलं की भारतीयांना आठवतो 1971 च्या युद्धातला गौरवशाली पराक्रम. एकाच वेळी पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर दरारा निर्माण करणारी विक्रांत. मात्र विक्रांतच्या निवृत्तीनंतर तिची जागा घेऊ शकेल अशा बलाढ्य विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता होती. 

नव्या विक्रांतच्या आता डीप सी ट्रायल्स सुरू झाल्या आहेत. देशाची मदार सध्या एकट्या रशियाकडून खरेदी केलेल्या आयएनएस विक्रमादित्यवर आहे. मात्र आता विक्रमादित्यला साथ द्यायला विक्रांत लवकरच नौदलात येत आहे. 

पाकिस्तान या परंपरागत शेजाऱ्यामुळे पश्चिम किनारपट्टी संवेदनशील आहेच. पण चीनच्या कारवायांमुळे बंगालचा उपसागरही संवेदनशील झाला आहे. तसंच हिंदी महासागरात भारतीय नौदलाचं वर्चस्व राखण्यासाठी भारताला दोन विमानवाहू युद्धनौकांची गरज आहे. त्यामुळे विक्रांतच्या या प्रगतीवर संपूर्ण देशाचं लक्ष आहे.