मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही मराठी भाषेच्या अनुवादावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी अनुवाद तर नव्हताच पण गुजरातीत अनुवाद उपलब्ध असल्याच आरोप मुंडे यांनी केलाय. तर हा आरोप चुकीचा असून यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्ष आणि सभापती करणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात मराठीचा अपमान झालाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहाची माफी मागण्याची वेळ आली. भाजप-सेना सरकारच्या चौथ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. भाषणाचा मराठी अनुवाद नसल्यानं विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.
याच मुद्द्यावर गोंधळ घालत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माफी मागत संबंधीत कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाई करून घरी पाठवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. अध्यक्षांनीही आजच कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. विधीमंडळ परिसरातली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ९ मार्चला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.