SSR case: पंतप्रधान मोदींच्या बायोपिकसाठी गुजरात सरकारने संदीप सिंहला पैसे दिले?

संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला 

Updated: Aug 30, 2020, 10:04 AM IST
SSR case: पंतप्रधान मोदींच्या बायोपिकसाठी गुजरात सरकारने संदीप सिंहला पैसे दिले? title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला संदीप सिंह याच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांची आणखी काही माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी रविवारी ट्विट करून यासंदर्भात भाजपवर नवे आरोप केले. संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. 

SSR case: संदीप सिंह यांच्यासोबतच्या 'त्या' फोटोवर फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

गुजरात सरकारशी करार होण्यापूर्वी २०१७ मध्ये संदीप सिंहच्या कंपनीला ६६ लाखांचा तोटा झाला होता. यानंतरच्या वर्षात त्याच्या कंपनीला ६१ लाखांचा फायदा झाला. तर २०१९ मध्ये संदीप सिंहच्या कंपनीला पुन्हा ४ लाखांचा तोटा झाला. तरीही गुजरात सरकारने त्याच्या कंपनीशी १७७ कोटी रुपयांचा करार केला. कशाच्या आधारावर विजय रुपाणी यांनी हा करार केला?, असे प्रश्न सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

SSR case: 'संदीप सिंहने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन केला होता'

यापूर्वी सचिन सावंत यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या हवाल्याने संदीप सिंह याने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन केल्याचा दावा केला होता. तसेच संदीप सिंह लंडनला पळून जाण्याच्या तयारीत होता. याशिवाय, सचिन सावंत यांनी संदीप सिंहचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा फोटो ट्वीट केला होता. संदीप सिंह हा बॉलिवूडमधील एक निर्माता असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला होता. त्यामुळे भाजपशी असलेल्या त्याच्या संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांनी केली होती.