ईशा अंबानी-आनंद पिरामलला ४५० कोटींचा बंगला गिफ्ट

रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी आनंद पिरामलसोबत लग्न करत आहे.

Updated: Nov 17, 2018, 11:34 PM IST
ईशा अंबानी-आनंद पिरामलला ४५० कोटींचा बंगला गिफ्ट  title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी आनंद पिरामलसोबत लग्न करत आहे. लग्नानंतर ईशा अंबानी आणि आनंद पिरामल मुंबईमधल्या समुद्रासमोर असलेल्या बंगल्यामध्ये राहायला जातील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पिरामल कुटुंबानी हा बंगला हिंदुस्तान युनिलिव्हरकडून विकत घेतला होता. आता हा बंगला पिरामल कुटुंब ईशा आणि आनंदला गिफ्ट म्हणून देणार आहेत.

मुंबईच्या वरळी भागात असलेला हा पाच मजली बंगला २०१२ साली पिरामल कुटुंबानं ४५० कोटी रुपयांना विकत घेतला होता. सध्या या बंगल्याच्या नुतनीकरणाच्या कामासाठी हजारो कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहे. १ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

५० हजार स्क्वेअर फूटांच्या या बंगल्यामध्ये सगळ्या नवीन सुविधा असणार आहेत. या बंगल्यात स्विमिंग पूल, मंदिर, तीन मजल्यांचं पार्किंग आणि नोकरांसाठी वेगळ्या खोल्या आहेत.

ईशा अंबानी सध्या मुंबईतल्या एंटिलिया या २७ मजल्यांच्या बंगल्यात राहते. एंटिलिया बंगला ४ लाख स्क्वेअर फुटांचा आहे. मुकेश अंबानींचं हे घर जगातलं सगळ्यात महागडं घर असल्याचं फोर्ब्सच्या २०१४ सालच्या यादीत समोर आलं होतं. एंटिलिया हे नाव अटलांटिकमधल्या एका पौराणिक बेटाच्या नावावरून ठेवण्यात आलं.

एंटिलियामध्ये ६ मजली अंडरग्राऊंड पार्किंग, तीन हेलिकॉप्टर पॅड आहेत. एंटिलियाच्या देखरेखीसाठी ६०० कर्मचारी रोज काम करत असल्याचंही बोललं जातं. सप्टेंबर महिन्यामध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा साखरपुडा झाला. इटलीच्या लेक कोमोमध्ये हा शाही सोहळा पार पडला. १२ डिसेंबरला मुंबईमध्ये ईशा आणि आनंद यांचं लग्न होणार आहे.