जयंत पाटीलांनी हा फोटो पोस्ट करीत शिवसेनेला दिल्या शुभेच्छा; कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाकरे आणि पवार यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Jun 19, 2021, 12:54 PM IST
जयंत पाटीलांनी हा फोटो पोस्ट करीत शिवसेनेला दिल्या शुभेच्छा; कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा title=

मुंबई : शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्षांपैकी एक आहे. शिवसेनेची स्थापना स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली आजच्या दिवशी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षदेखील राज्यातील प्रमुख पक्ष आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री शिवसेना स्थापनेच्याही आधीची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाकरे आणि पवार यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर शिवसेनेला शुभेच्छा देत म्हटले की, 'भूमिपुत्रांना या राज्यात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशातून शिवसेनेचा जन्म झाला. राज्यातील सामान्य लोकांच्या हक्कांसाठी शिवसेनेने कायमच संघर्ष केला आहे. राज्यातील सामान्य घरातील तरुणांना शिवसेनेनेच आमदार, खासदार, मंत्री केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरद पवार साहेब यांची शिवसेनेच्या स्थापने पुर्वीपासून मैत्री होती. 
आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाच्या या राज्यातील सरकारने देशाला नवी दिशा दिली आहे. 
शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे व सर्व शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा ! 

पाटील यांच्या पोस्टमुळे सेना आणि राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. या पोस्टला सोशलमीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.  वर्धापन दिनानिमित्त सेनेच्या राजकीय कारकिर्दीविषयी नेटकरी सोशलमीडियावर व्यक्त होत आहेत.