अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता गप्प का; आव्हाडांचा खोचक सवाल

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर नुकताच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भातील एक विनोद शेअर केला होता. 

Updated: Jun 26, 2020, 11:57 AM IST
अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता गप्प का; आव्हाडांचा खोचक सवाल title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई:  देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार असताना पेट्रोल, डिझेल दरवाढीवर टीका करणार्‍या बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही खोचक सवाल केले आहेत. यूपीएच्या काळात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीवर ट्विटवरून सरकारवर खोचक शब्दात टीका केली होती. मात्र देशात मागील सलग २० दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असूनही या दोन्ही अभिनेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या दोघांना टॅग करून आव्हाड यांनी खोचक सवाल केले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी 24 मे 2012 साली पेट्रोल, डिझेल दरवाढीवर टीका करताना "पेट्रोलचे दर 7.5 रुपयांनी वाढले. पंप अटेंडन्ट - कितने का डालू?! मुंबईकर - 2-4 रुपये का कार के ऊपर स्प्रे कर दे भाई, जलाना है!!"
अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटला जितेंद्र आव्हाड यांनी त्याच खोचक पद्धतीने आता उत्तर दिलं आहे. आव्हाड आपल्या ट्विटमध्ये लिहतात -"तुम्ही पेट्रोल पंपावर तुमच्या गाडीत पेट्रोल भरले नाही की बिल बघितले नाही. तुम्ही बोलण्याची ही वेळ आहे, आशा करतो तुम्ही पक्षपाती नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठलाय, अब मुंबईकर क्या करे कार जलाए या कार चलाये? "

 


 

अक्षय कुमारलाही आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. अक्षय कुमारने 16 मे 2011 रोजी पेट्रोल, डिझेल दरवाढीवर टीका करणारे ट्विट केले होते, त्यात त्याने म्हटले होते," रात्री माझ्या घरीही जाऊ शकत नाही, कारण पुन्हा किंमती वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती." अक्षय कुमार याच्या या ट्विटवर आव्हाड यांना खोचक सवाल विचारले आहेत. आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात, "तू ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह नाहीस का? तू कार वापरणे बंद केले आहेस का? तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? अक्षयकुमार पेट्रोल, डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे, तुझ्या माहितीसाठी सांगतोय." काँग्रेस सरकारच्या काळात टीका करणारे सेलिब्रिटी सध्या शांत असल्याने आव्हाड यांनी त्यांना याबाबत आठवण करून दिली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. सलग 20व्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल २१ पैसे तर डिझेल १७ पैशांनी महागले आहे. ७ जूनपासून पेट्रोल ९ रुपयांनी वाढलं आहे. डिझेल ११ रुपयांनी महागलं आहे.

पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत एक लीटर डिझेलची किंमत 80.19 रुपये इतकी झाली आहे. तर पेट्रोल 80.13 रुपये इतकं आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलमधील दर तफावत भरुन निघाली.