एकनाथ शिंदेंनी आशिर्वाद घेतलेल्या कामाख्या देवीचा इतिहास तुम्हाला करेल आश्चर्यचकित

आसामच्या नीलाचल टेकडीवर कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे प्रसिद्ध मंदिर गुवाहाटीपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. पौराणिक आणि धार्मिक मान्यतेनुसार, देवी सतीच्या योनीचा काही भाग या ठिकाणी पडला होता, त्यामुळे हे एक प्रमुख शक्तिपीठ आणि पवित्र स्थान मानले जाते.  

Updated: Jun 29, 2022, 04:35 PM IST
 एकनाथ शिंदेंनी आशिर्वाद घेतलेल्या कामाख्या देवीचा इतिहास तुम्हाला करेल आश्चर्यचकित  title=

मुंबई - शिवसेनेत बंडखोरी केलेले आमदार मागील सात दिवसांपासून आसाममध्ये मुक्कामी आहेत. सध्या राज्याचे केंद्रबिंदु आसाममधील गुवाहाटी झाले आहे. महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानभवनात फ्लोर टेस्ट देणार आहे. तर बंडखोर आमदार आज मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करतील. पण मुंबईत येण्याआधी एकनाथ शिंदे आणि सोबत असणाऱ्या आमदारांनी आसाममधील कामाख्या देवीचे दर्शन घेत सत्तास्थापनेसाठी आशिर्वाद घेतल्याचे समजत आहे. शिंदे गटानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर कामाख्या देवीचे मंदिर परत एकदा देशभरात चर्चेत आले आहे. 

कामाख्या देवी मंदिर नीलाचल टेकडीवर स्थित आहे
आसामच्या नीलाचल टेकडीवर कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे प्रसिद्ध मंदिर गुवाहाटीपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. पौराणिक आणि धार्मिक मान्यतेनुसार, देवी सतीच्या योनीचा काही भाग या ठिकाणी पडला होता, त्यामुळे हे एक प्रमुख शक्तिपीठ आणि पवित्र स्थान मानले जाते. या मंदिराविषयी असे म्हणतात की येथे तांत्रिक सिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. हे ठिकाण तंत्रसिद्धीसाठी अत्यंत पवित्र आणि योग्य मानले जाते. 

या शक्तीपीठाबद्दल पौराणिक कथा
दक्ष प्रजापतीच्या वागण्याने क्रोधित होऊन देवी सतीने आपले शरीर अग्नीला अर्पण केले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे भगवान शंकर इतके क्रोधित झाले की देवी  सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तांडव करू लागले. असे केल्याने संपूर्ण विश्व हादरले आणि विश्वात आपत्तीची परिस्थिती आली. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने  देवी सतीच्या शरीराचे अनेक भाग केले.  देवी सतीच्या शरीराचा भाग जिथे पडला तिथे शक्तीपीठाची स्थापना झाली. देवी सतीचा योनी भाग कामाख्यात पडला होता. त्यामुळे हे शक्तीपीठ खूप प्रसिद्ध आहे आणि त्याला खूप ओळख आहे.

असे मानले जाते की देवीचे हे एकमेव रूप आहे जिथे दरवर्षी देवीला मासिक पाळी येते. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते पण कामाख्या देवीवर श्रद्धा ठेवणार्‍यां भक्तांकडून सांगितले जाते की देवीच्या मासिक पाळीच्या काळात संपूर्ण ब्रह्मपुत्रा नदीचा रंग लाल होतो. दरवर्षी 22 जून ते 26 जून या काळात देवी तिच्या मासिक पाळीत असते या कालावधीत कामाख्या देवीची अंबुबाची जत्रा भरते. अशा वेळी देवीचे दर्शन बंद केले जाते. या दरम्यान मंदिराचे दरवाजेही बंद केले जातात. पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले जाते की अशा तीन दिवसांत कामाख्या देवी मासिक पाळीत राहते आणि तिच्या योनीतून रक्तस्त्राव होतो.

अनोख्या प्रसादाची प्रथा
येथे खास प्रकारचा प्रसाद मिळतो. प्रसाद म्हणून भक्तांना देवीचे ओले कापड दिले जाते, त्याला अंबुबाची कापड म्हणतात. असे म्हणतात की जेव्हा देवीला जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा तिच्या मूर्तीभोवती पांढरे वस्त्र पसरवले जाते. तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा कापड लाल झालेले असते असे स्थानिकांकडून सांगण्यात येते. नंतर हेच कापड प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटले जाते. 

कामाख्या देवी मंदिरात कसे जायचे?
कामाख्या देवी मंदिरात भाविक बस, ट्रेन आणि विमानाने पोहोचू शकतात. कामाख्या देवीचे जवळचे बसस्थानक पलटन बाजार आहे. जिथून मंदिराचे अंतर फक्त 7 किलोमीटर आहे. येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कामाख्या जंक्शन आहे. तेथून मंदिराचे अंतर 4.7 किमी आहे. येथील सर्वात जवळचे विमानतळ गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तेथून कामाख्या देवी मंदिराचे अंतर सुमारे 19 किमी आहे.