गरज असेल तर त्यांनी संपर्क करावा, ओवेसींची भूमिका... अपक्ष आणि छोटे पक्ष ठरणार किंगमेकर

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांचं महत्त्व वाढलं, महाविकास आघाडी आणि भाजपकडून भेटीगाठी

Updated: Jun 7, 2022, 06:29 PM IST
गरज असेल तर त्यांनी संपर्क करावा, ओवेसींची भूमिका... अपक्ष आणि छोटे पक्ष ठरणार किंगमेकर title=

Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टी, एमआयएम, हितेंद्र ठाकूर तसंच अपक्ष आमदार जोरगेवारांनी मविआघाडीचं टेन्शन वाढवलंय. राज्यसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना महत्व आलं आहे. आपल्या बाजूनं मतदान करावं यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून छोट्या पक्षांना गळ घातली जातेय. त्यामुळे या निवडणुकीत छोटे पक्ष, अपक्ष आमदार 'किंगमेकर' ठरणार आहेत. आता या छोट्या पक्षांचा, अपक्षांचा नेमका कुणाला पाठिंबा असेल याकडेच सर्वांचं लक्ष असेल. 

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. पाठिंबा हवा असल्यास महाविकास आघाडीने आपल्याकडे यावं आणि मदत मागावी अशी भूमिका असदुद्दीन ओवेसी यांनी घेतली आहे. भाजपला दूर ठेवायचं असेल तर महाविकास आघाडीने आमच्याकडे मदत मागावी, आम्ही विचार करू असं ओवेसी यांनी म्हटलंय. आमच्याशी कोणी संपर्क केलेला नाही. संपर्क साधल्यास विचार करू असं ओवेसी म्हणाले.

तर ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीला पेचात टाकलंय. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने मुस्लिमांविषयी काय केलं असा सवाल आमदार रईस शेख यांनी केलाय. रईस शेख यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यात त्यांनी समाजवादी पार्टीच्या पत्रावर स्पष्टीकरण देण्याची मागणी परब यांच्याकडे केली. 

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं ठरवलंय. मंगळवारी संध्याकाळी होणाऱ्या आघाडीच्या आमदारांच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांनी दिलेल्या सूचनेचं पालन करू, असं सांगतानाच महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होतील, असा दावा भुयार यांनी केला