Rahul Gandhi criticizes BJP : भाजपने सलग तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन केलं. यंदा मित्रपक्षांच्या मदतीने भाजपला सत्तेची चावी मिळाली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीमुळे काँग्रेसचा वट देखील वाढलाय. अशातच नव्या मंत्रिमंडळावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्रातील एनडीए सरकारला धारेवर धरलंय. नव्या मंत्र्यांमध्ये अनेकांची पार्श्वभूमी घराणेशाहीची असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. या मंत्र्यांच्या घराणेशाहीचा इतिहासच त्यांनी जाहीर केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लांबलचक यादीच जाहीर केलीये.
एच.डी. कुमारस्वामी : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडांचे पुत्र
ज्योतिरादित्य शिंदे : माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदेंचे पुत्र
जयंत चौधरी : माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे नातू
रक्षा खडसे : माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या सूनबाई
चिराग पासवान : माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवानांचे पुत्र
पियूष गोयल : माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र
राम मोहन नायडू : माजी केंद्रीय मंत्री येरेन नायडूंचे पुत्र
अनुप्रिया पटेल : अपना दल संस्थापक सोनेलाल यांच्या कन्या
अन्नपूर्णा देवी : माजी आमदार रमेश प्रसाद यादवांची पत्नी
यानिमित्तानं त्यांनी पंतप्रधान मोदींनाही टोला लगावला. काँग्रेसच्या अनेक पिढ्यांचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाला घराणेशाही म्हणणारे प्रत्यक्षात आपल्या सरकारी परिवारामध्येच वारसा हक्कासारखं सत्तेचं वाटप करत आहेत. बोलणं आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातला हा फरक म्हणजेच नरेंद्र मोदी, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांना डिवचलं.. लोकसभा प्रचारात काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजपला राहुल गांधींनी कोंडीत पकडल्याची चर्चा सुरू झालीय.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 'मोदी का परिवार' हे कॅम्पेन चालवलं होतं. त्यावरून देखील मोठा वाद झाला होता. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली होती. अशातच आता निवडणूक संपल्यानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 'मोदी का परिवार' हे हटवावं, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.