मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. लता दीदींच्या जाण्याने एका काळाचा अंत झाला. दीदी आपल्यात नेहमीच गाणं आणि संगीताच्या माध्यमातून मनात राहतील. दरम्यान दीदींच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठात घेतला. दरम्यान विद्यापीठाच्या या निर्णयावरुन मंगेशकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. तसेच विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर (Suhas Pednekar) यांना पत्र लिहत याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (lata mangeshkar family has wrote letter to vice chancellor of mumbai univesity suhas pednekar)
पत्रात काय म्हंटलंय?
मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन व्हावं, अशी लता दीदींची इच्छा होती. दीदींच्या इच्छेनुसार, राज्य सरकारने तेव्हा मंगेशकर कुटुंबातील सदस्य आणि संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली.
या समितीने शिफारस केली. त्यानुसार, मुंबई विद्यापीठात जागेची पाहणी करण्यात आली आणि ती निश्चित झाली. मात्र दुर्देव असं की, लता दीदी हयात असताना समितीने निश्चित केलेली जागा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. जागा उपलब्ध न झाल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महाविद्यालयाचं स्वप्न हे दीदींच्या हयातीत पूर्ण झालं नाही. याबाबतची नाराजी मंगेशकर कुटुंबियांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
तसेच दीदीही आता राहिल्या नाहीत. त्यामुळे आता त्या शासकीय संगीत महाविद्यालयाचं नाव हे दीदींच्या नावासह मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने म्हणजेच 'भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय' या नावाने स्थापन करण्यात यावं, अशी मागणी मंगशेकर कुटुंबियांची आहे. मंगेशकर कुटुंबियांनी याबाबतची मागणी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना केली आहे. त्यानुसार सरकार हा निर्णय जाहीर करेल, असं या पत्रात म्हंटलं आहे.
थोडक्यात सांगायचा मुद्दा की, लता दीदींच्या नावासह मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचं नावही जोडून घेण्यात यावं, अशी मागणी कुटुंबियांची आहे. मात्र मुंबई विद्यापीठातील अध्यासन केंद्र हे लता दीदींच्या नावाने सुरु करण्यात येत आहे. हा निर्णय कुटुंबियांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचं कुटुंबियांनी या पत्राद्वारे म्हंटलं आहे.
त्यामुळे यापुढे विद्यापीठ प्रशासनाने कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लता दीदींच्या नावाने कोणताही उपक्रम हाती घेऊ नये, असंही या पत्रात नमूद केलंय.