Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. उमेदवार जाहीर झाले नसले तरी राज्यभरात प्रचार दौरे सुरु करण्यात आलेत. मात्र महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi)) जागावाटपचा मुद्दा कळीचा ठरतोय. 48 लोकसभा जागांवर कोण कुठून लढणार याची वाटणी अजून झालेली नाही. अशात महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जागावाटपासंदर्भात काल रात्री 35 मिनिटं बैठक बैठक पार पडली. सह्याद्री अतिगृहावर ही बैठक पार पडली.
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला
या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्राकडून मिळतेय. भाजप-28, शिंदे गट-16 आणि अजित पवार गट 4 जागा लढणार असं सुत्रांकडून समजतंय. त्यामुळे महायुतीच्या जागावाटप फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. मात्र या बैठकीतह काही जागांचा तिढा सुटलेला नाही. 13 जागांचा तिढा अजूनही कायम आहे.. दरम्यान 400 प्लसचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा. अशा सूचना अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. जागावाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपलं मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा अशा सूचना शाहांनी दिल्या.
या जागेवरुन महायुतीत कलगीतुरा
मावळ लोकसभा जागेवरुन महायुतीत कलगीतुरा पाहायला मिळतोय. महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर दावा केलाय. कुणीही कितीही दावे केले तरी महायुतीचा उमेदवार मीच असेन असा विश्वास विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंनी व्यक्त केलाय.. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरुनही महायुतीत चुरस वाढलीय. या मतदारसंघावर एकीकडे नारायण राणेंनी दावा केलाय. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानंही हक्क सांगितलाय. लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार किरण सामंतच असावेत असा ठरावच शिंदे गटाकडून मांडण्यात आलाय. किरण सामंतांच्या नावाचा ठराव मुख्यमंत्री शिंदेंकडे दिला जाणारेय.
बारामतीत अजित पवार गटाचा उमेदवार
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना लोकसभा निवडणुकीसाठी रंगणार हे जवळपास निश्चित झालंय, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यासंबंधी सूचक वक्तव्य केलंय. बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर तिथून सुनेत्रा पवारच निवडणूक लढणार अशी घोषणा सुनील तटकरेंनी केलीय. दुसरीकडे बारामतीत सुप्रिया सुळेंचे प्रचार रथ फिरू लागलेत. लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपली उमेदवारी जाहीर करून बारामतीत प्रचाराला सुरुवात केलीय. सुप्रिया सुळे यांचे उमेदवार आणि चिन्ह असलेले प्रचार रथ आता बारामतीत फिरू लागलेत.