मविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?

Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 

Updated: Mar 26, 2024, 07:15 PM IST
मविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात? title=

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत  गेले अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. अखेर मविआचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलंय.  शिवसेना उद्धव ठाकरे गट 22 जागांवर, काँग्रेस 16 जागांवर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 10 जागांवर लढणार आहे. भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्नसुद्धा सुटल्याची माहिती आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, जालन्याची जागा काँग्रेस, सांगलीची आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी (Raju Shetty) महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. वंचित बहूजन आघाडीला मविआकडून आणखी एका जागेचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे वंचितच्या प्रस्तावानंतर ठाकरे गट आपले उमेदवार जाहीर करणार आहे. 

महायुतीचा तीन जागांवरुन तिढा कायम
महाविकास आघाडीत ठरलं असलं तरी महायुतीत (Mahayuti) मात्र तीन जागांवरून तिढा कायम आहे. ठाणे, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून वाद आहे. या तीन जागांपैकी भाजपाला एक जागा हवीय. मात्र, एक जागा भाजपला देण्यास शिंदे अनुकूल नाहीत. भाजपाने पालघर किंवा रत्नागिरी-सिंधुदुर्ग यापैकी एक जागा लढवण्याची भूमिका घेतलीय. याबाबत महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा बैठक घेत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्लीतून भाजपा पक्ष श्रेष्ठीने दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महायुतीचा तिढा तेव्हा तरी सुटेल अशी अपेक्षा आहे.

अजित पवार गटाचं जागावाटप ठरलं?

दरम्यान, जागावाटपाचं 99% काम पूर्ण झालं असून 28 मार्चला उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस यांच्यासोबत यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हे ही वाचा : पक्षविरोधी भूमिका भोवणार, विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस

 

ढळराव अजित पवार गटात

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच शिरुरच्या जागेचा प्रश्न जवळपास निकालात निघालाय. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरूरच्या उमेदवारीसाठी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव-पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आता आढळराव विरूद्ध कोल्हे असा सामना रंगणार आहे. यावेळी केलेल्या भाषणात आढळरावांनी अमोल कोल्हेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काही जणं म्हणता मी बेडूक उड्या मारल्यात, पण हा तिनही पक्षांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. जे आरोप करतात, त्यांनी आपला इतिहास तपासावा असं प्रत्युत्तर आढळराव-पाटील यांनी दिलंय.