किरीट सोमय्यांना डच्चू, उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी ?

किरीट सोमय्यांना भाजपाकडून उमेदवारीसाठीचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा आहे. 

Updated: Apr 3, 2019, 05:24 PM IST
किरीट सोमय्यांना डच्चू, उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी ?  title=

मुंबई : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे निवासस्थान 'मातोश्री'वर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरिट सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. किरिट सोमय्या यांना उत्तर पूर्व मुंबई मतदार संघातून उमेदवारी देण्यास शिवसेनेकडून कडवा विरोध होत आहे. त्यामुळे युतीसमोर याठिकाणी मोठा पेच निर्माण झाला होता. या ठिकाणच्या जागेची उमेदवारी भाजपाने अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. पण उत्तर मुंबई मतदार संघातून किरिट सोमय्या यांना डच्चू मिळाला असून मनोज कोटक यांना भाजपाची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Image result for kirit somaiya and manoj kotak zee news

शिवसेना भाजपाच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या संसदीय समितीनं निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किरीट सोमय्यांना भाजपाकडून उमेदवारीसाठीचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा आहे. शिवसेनेनं तीव्र विरोध केल्यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. 

भाजपाने ऐनवेळी किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिलीच तर शिवसेनेने सुनिल राऊत यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठेवली होती. सुनिल राऊत हे सध्या भांडुप विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पण आता कोटक यांच्या उमेदवारीची चर्चा झाल्याने राऊत यांच्या नावाची चर्चा शांत झाली आहे. उमेदवारीचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाण्याचीही तयारी केली होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमय्यांना भेट नाकारल्याचेही वृत्त आहे. अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरताना तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळीही किरिट सोमय्यांच्या अर्जाबाबत चर्चा होणार असल्याचे युतीच्या गोटातून सांगण्यात येत होते.