मुंबई : भाजपानं काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपात प्रवेश दिलाय. रणजितसिंह मोहिते पाटलांनी आपले वडील विजयसिंह मोहिते पाटील वगळता सर्व कुटुबीयांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीत घुसमट होत नसल्यानं नव्हे तर मोदींनी केलेल्या विकासामुळेच भाजपात प्रवेश करत असल्याचं रणजितसिंहांनी यावेळ सांगितलं. तर मोहिते घराण्याचा भाजपात योग्य मान राखला जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. मात्र रणजितसिंहांना माढ्याची उमेदवारी देणार नसले तरी माढ्यातून भाजपाचाच खासदार होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईत वानखेडे स्टेडियम शेजारी गरवारे सभागृहात त्यांचा भाजपा प्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्टेजवर सदाभाऊ खोतही उपस्थित होते.
यावेळी बोलताना, 'विधानपरिषदमध्ये सदस्य असल्यापासून आपलं भाजपबरोबर आपुलकीचे नातं निर्माण झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी सर्व गट-तट बाजुला सारत राज्य प्रगतीपथावर नेले. माढा, सोलापूरमधील विविध प्रश्न सोडवले. रेल्वेचा प्रश्न सोडवला. पासपोर्ट कार्यालयचा प्रश्न सोडवला. आवर्जून सांगायचं म्हणजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे रस्त्यांची कामे झाली... त्यामुळे, मोहिते पाटील राष्ट्वादीत असून कामं कशी होतात? अशी टीकाही आमच्यावर झाली' असं म्हणतानाच 'आम्हाला तुमच्याबरोबर काम करायची संधी दिलीत, तुम्ही सांगाल ते पुढे राजकारण-समाजकारण करू' असं आश्वासनही रणजितसिंह पाटील यांनी यावेळी भाजप नेत्यांना दिलंय.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांचं पक्षात स्वागत केलं. 'आज राजकारणातील एक महत्त्वाचा दिवस आहे, महाराष्ट्राचे राजकारण मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी युवा नेता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे मोठं घराणं भाजपसोबत जोडत आहे याचा मोठा आनंद आहे' असं म्हणतानाच 'पुढचा माढाचा खासदार भाजपाचाच असेल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
शेकडो समर्थकांसह रणजितसिंह भाजपात दाखल झालेत. त्यापूर्वी त्यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली. रणजितसिंह यांच्यासोबतच धैर्यशील मोहिते पाटील (चुलतभाऊ), माळशिरस पंचायतमधील वैष्णोदेवी मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनीही यावेळी भाजप प्रवेश केला. सोलापूरच्या राजकारणाला यामुळे मोठा हादरा बसलाय. यापूर्वी, भाजपाप्रवेश करण्याआधी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 'झी २४ तास'ला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. 'पक्षातल्या घुसमटीमुळे नाही तर मोदींच्या करिष्म्यामुळे प्रभावित होऊन भाजपा प्रवेश करत असल्याचं' त्यांनी यावेळी म्हटलं.