Versova-Virar Sea Link: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या वाटेला काय येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. शेतकरी, महिला, गुंतवणुक यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसंच, राज्यातील पायाभूत सुविधांसाठीही यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरदूत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत अॅन्युईटी योजना भाग-2 अंतर्गंत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे तसंच, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मधील 7 हजार 600 कोटी रुपये खर्चून 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नतीचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटींची तरदूत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एमएमआरडीएने यापूर्वीच वर्सोवा- विरार सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत करण्याच्या विचार केला होता. आता अर्थसंकल्पातही या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. यापूर्वी वरळी ते वांद्रेनंतर वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार असा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत होणार आहे.
वर्सोवा ते पालघर सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते वरळीहून थेट पालघरपर्यंत विनाअडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे. वर्सोवा ते विरार ही मार्गिका 42.75 किमी आहे. मात्र, आता पालघरपर्यंत हाच मार्ग पुढे वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं हा सागरी सेतू 10 ते 11 किमीने वाढणार आहे. एमएमआरडीएने वर्सोवा-विरार-पालघर सागरी सेतूचा नव्याने आराखडा केला जात आहे. त्यासाठी नोव्हेंबर 2023मध्ये निविदाही जारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, वर्सोवा-विरार सागरी सेतू 42.75 किमी लांबीचा आणि आठ मार्गिकांचा आहे. या सागरी सेतूला चारकोप, उत्तन वसई, विरार असे एकूण चार आंतरबदल (Interchange) असणार आहे. पण वर्सोवा-विरारचा विस्तार पालघरपर्यंत होणार असल्याने भविष्यात हा प्रकल्प 100 किमीहून अधिक लांबीचा प्रकल्प ठरणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी 63 कोटी 426 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.