दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांचा गुंता काही केल्या सुटायला तयार नाही. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली. दिल्लीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या असल्या तरी महाराष्ट्रात हे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाइन परीक्षांबाबतीत कुलगुरूंचं मत प्रतिकूल आहे. ग्रामीण भागात निम्म्या ग्रामपंचायतीत इंटरनेट नाही. ऑनलाईन परीक्षा हा महाराष्ट्रात पर्याय होऊ शकत नाही. भौगोलिक विचार करता राज्यात ऑनलाईन परीक्षा शक्य नसल्याचे मत सर्व कुलगुरूंनी नोंदवले आहे, याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीत ऑनलाईन परीक्षा घेतायत, तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला असेल. महाराष्ट्रात सिंधुदुर्गपासून ते गडचिरोलीचा भौगोलिक विचार करता हे शक्य नाही. राज्यात परीक्षा होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. आपत्कालीन समितीने तसा निर्णय घेतलाय. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक बोलता येणार नाही, आम्ही न्यायालयात ही भूमिका मांडली आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या मुद्द्यावरुन राज्य आणि केंद्र सरकार अनेकदा आमनेसामने आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परीक्षा घेण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपातकालीन परिस्थितीचे कारण देत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. परंतु, यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC सप्टेंबरच्या अखेरीस परीक्षा घेण्याचे आदेश दिल्याने याबाबतचा संभ्रम आणखी वाढला होता.