उद्योगांमध्ये नोकऱ्यांसाठी राज्य सरकारचे एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल

लॉकडाऊननंतर राज्यात उद्योगचक्र सुरू झाल्याचा उद्योगमंत्र्यांचा दावा

Updated: Jun 5, 2020, 05:44 PM IST
उद्योगांमध्ये नोकऱ्यांसाठी राज्य सरकारचे एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल title=

दीपक भातुसे, मुंबई :  मिशन बिगेन अगेन मिशनमध्ये उद्योग विभागही सज्ज झाला असून आतापर्यंत ५५ हजार २४५ उद्योगांनी उत्पादन सुरु केले आहे. तर १३ लाख ८६ हजार कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी दिली. राज्यातील तरुणांना उद्योगांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी वेगळे पोर्टल सुरू करत असल्याची घोषणाही उद्योगमंत्र्यांनी केली.

कोणते उद्योग सुरु झाले?

मुंबई आणि लगतच्या महापालिका तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव येथील अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना सरकारने परवानगी दिली आहे. तसेच निर्यात करणाऱ्या उद्योगांनाही परवानगी दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. शेतीवर आधारित उद्योग आणि संरक्षण दलाला लागणाऱ्या उत्पादनांच्या उद्योगांनाही परवानगी दिली असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. राज्यात उद्योग चक्र वेगाने फिरू लागल्याचा दावा उद्योगमंत्र्यांनी केला आहे.

नवी गुंतवणूक आणि एमआयडीसी

उद्योग विभाग आणि एमआयडीसी उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील आहे. देशातील विदेशी गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते. या गुंतवणूकदारांसाठी आणखी चांगले वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे, असं उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे १५ हजार एकरांवर नवी एमआयडीसी उभी राहत आहे. माणगाव एमआयडीसी असं या एमआयडीसीचे नाव असेल. देशी आणि विदेशी १० गुंतवणूकदारांशी आमची बोलणी सुरु आहेत. त्यांना येथे उद्योग सुरु करण्यासाठी जागा दिली जाईल, असे देसाई यांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदर या एमआयडीसीपासून जवळ असल्याचे ते म्हणाले. येथे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते आणि हजारो नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात, अशी माहिती देसाई यांनी दिली. इंजिनिअरिंग, औषध उत्पादक, इलेक्ट्रॉनिक असे विविध उद्योग येथे उभे राहतील, अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.

स्थानिकांना नोकऱ्यांसाठी एम्पॉयमेंट ब्युरो

मजूर आपआपल्या राज्यात परतले आहेत. राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट ब्युरो सुरु करण्याची घोषणा उद्योगमंत्री देसाई यांनी केली. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांतून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ पुरवले जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

जेथे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी या महिन्यातच आणखी काही उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असे देसाई म्हणाले.