राज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे. 

Updated: Nov 6, 2020, 08:38 PM IST
राज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक  title=
संग्रहित छाया

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आता काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. याआधी राज्य सरकारकडून १२ नावे देण्यात आली होती. मात्र, त्यावर आक्षेप घेत यादी फेटाळली होती. दरम्यान, आता आम्ही सर्व बाबींची पूर्तता करुन ही नवी यादी (MLA List) दिलेली आहे. राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी भेट घेत १२ जणांची यादी सादर केली. मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली.

मलिक पुढे म्हणाले, राज्यपाल यादी मंजूर करतील की, नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिलेली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे. त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त केला.

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी यादी राज्यपालांना देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र आणि राज्य मंत्रिमंडळचा ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र देण्यात आले आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

राज्यपालांना दिलेल्या यादीतील नावे

शिवसेना उमेदवार

- उर्मिला मातोंडकर
- नितीन बानगुडे पाटील
- विजय करंजकर
- चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी काँग्रेस 

- एकनाथ खडसे
- राजू शेट्टी
- यशपाल भिंगे 
- आनंद शिंदे 

 काँग्रेस 

- सचिन सावंत
- रजनी पाटील
- मुजफ्फर हुसैन
- अनिरुद्ध वणगे