Mumbai News Today: पावसाळा सुरू झाल्यानंतर आजारांतही वाढ होतात. मुंबईत जूनच्या तुलनेत साथीच्या आजारांत दुपटीने वाढ झाली आहे. मुंबईत जूनमध्ये साथीच्या आजाराचे १३९५ रुग्ण सापडले होते. जुलैमध्ये त्यात दुपटीने वाढ झाली आहे. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू, कावीळ यासारख्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
जुलैमध्ये 3044 रुग्ण सापडले आहेत. यात गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू, कावीळ, स्वाईन फ्लू आणि लेप्टो या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलैत ३ हजार ४४ रुग्ण सापडले आहेत. जूनमध्ये महिन्याभरात सापडलेल्या १ हजार ३९५ रुग्णांच्या तुलनेत जुलैत अधिक रुग्ण सापडले आहेत.
जुलैमध्ये मुंबईतील साथीच्या आजारांमध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक १२३९ रुग्ण सापडले असून त्या खालोखाल हिवताप ७९७ रुग्ण, डेंग्यू ५३५ रुग्ण, स्वाईन फ्लू १६१ रुग्ण, कावीळ १४६ रुग्ण, लेप्टोचे १४१ रुग्ण तर चिकुनगुनियाचे २५ रुग्ण सापडले आहेत. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
राज्यामध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, आठवडाभरामध्ये राज्यामध्ये हिवतापाचे १५७८ रुग्ण तर डेंग्यूचे ८१४ रुग्ण सापडले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक गडचिरोलीमध्ये २६६ रुग्ण, मुंबईमध्ये २४९ रुग्ण आणि चंद्रपूरमध्ये ७६ रुग्ण सापडले. तसेच डेंग्यूचे सर्वाधिक मुंबईमध्ये १८३ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल नाशिक ७७ रुग्ण, कोल्हापूर ६१ रुग्ण, पालघर २९ रुग्ण सापडले आहेत.