'तुम्ही घरात बसून राज्य मागे टाकलं'; बापाची जहागिरी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politcis :  निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली, ही चूक माझी आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 14, 2024, 12:55 PM IST
'तुम्ही घरात बसून राज्य मागे टाकलं';  बापाची जहागिरी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर title=

Maharashtra Politcis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत घराणेशाहीवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. तरुणांनी राजकारणात येऊन घराणेशाही संपवायला हवी असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही, असं म्हटलं होतं. यासोबत शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही निशाणा साधला होता. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

"तेव्हा पक्षाची गरज होती. एक उच्चशिक्षित चेहरा त्यांना हवा होता. श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक जागा मिळाली. आपण ती जागा जिंकली. पण राज्यात विकासाची जी कामे सुरु आहेत त्याला केंद्राचे पाठबळ मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या नखाची पण सर तुम्हाला नाही. मोदीजी देशाला एका उंचीवर नेत आहेत. तुम्ही घरात बसून राज्य मागे टाकलं. मागे गेलेले राज्य पुढे जात आहे. तुम्ही अहंकारापोटी प्रकल्प बंद केले होते. राज्याला मागे टाकणे हे दुर्दैवी आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"हा बाळासाहेबांचा पक्ष आहे. तोच आम्ही पुढे नेत आहोत. बाळासाहेबांचे विचार विकनाऱ्यांनी, त्यांच्या विचारांना मूठमाठी देणाऱ्यांनी सत्तेच्या खूर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. या डीप क्लिन ड्राईव्हमुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना क्लीन स्वीप करुन टाकेल याची त्यांना धास्ती आहे. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ती संस्था चांगली असते. पण जेव्हा मेरिटवर निकाल लागतो तेव्हा संस्था वाईट असते. विधानसभा अध्यक्षांवर आरोप करणे लोकशाहीमध्ये घातक आहे. याला जनता सडेतोड उत्तर देईल, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"आता गद्दरांची घराणेशाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राणप्रिय वाटू लागली आहे. पण, कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही गाडायची आहे. गद्दारी आणि घराणेशाही लोकसभेत नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार आहे. काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. कारण, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली. ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधरायची आहे. मीही सुधारणार आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.