मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंवर अनेक आरोप केलेत. त्यातला एक मोठा आरोप आहे तो शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचंय हा... यात किती तथ्य आहे, शिंदेंना हे शक्य आहे का, बघुयात हा रिपोर्ट. (maharashtra political crisis chief eknath shinde and uddhav thackeray clashes)
राज्यातल्या सत्तासंघर्षानंतर आता शिवसेना कुणाची याचा संघर्ष सुरू झालाय. शिवसेना आणि बाळासाहेब कुणाचे याचा वाद आता राज्याच्या राजकारणात रंगणार आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केलाय. शिंदे थेट शिवसेनाच गिळायला निघाल्याचा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. शिवसेना फोडल्यानंतर शिंदेना आपलं स्थान मिळवायचं असल्याचा दावा ठाकरेंनी केलाय.
उद्धव ठाकरेंच्या या आरोपाला शिंदे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत उद्धव ठाकरेंवर टीका न करण्याचं धोरण स्वीकारलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी मात्र आता थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलंय. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची जागा कधीच घेऊ शकत नसल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केलीय.
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, हा वाद आता सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात जाऊन पोहोचलाय. एकीकडे हा 'सामना' सुरू असताना एकनाथ शिंदेंनी आपली वेगळी कार्यकारिणी जाहीर केलीये.
अर्थात, यामध्ये पक्षप्रमुख हे पद रिक्त ठेवून शिंदेंनी स्वतःची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करून घेतलीय. मात्र उद्धव ठाकरेंनी केलेल्या नव्या आरोपामुळे शिंदेंच्या मनात काय आहे, याची चर्चा पुन्हा सुरू झालीये. शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग निर्णय देणार असले तरी त्यापूर्वी यावर जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे नक्की.