Raj Thackeray Meet CM Shinde : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बंड करुन आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यांच्याबरोबर पक्षातील 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा पक्ष नव्याने उभा करण्यासाठी वयाच्या 83 व्या वर्षी राज्यव्यापी दौरा करण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरुन शरद पवार विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असा डाव रंगलाय.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राज्यात घडामोडी सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं. अजितदादांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्री नाराज आहेत अशी चर्चा रंगली आहे, यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं. पण या भेटीचं खरं कारण आता समोर आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज वसुली, बीडीची चाळीचा पुनर्विकास या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. आज संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नका असे निर्देश दिले. दरम्यान, यासंदर्भात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 20 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह इथं भेट घेतली होती. या बैठकीत नाशिक जिल्हा बॅंक सक्तीने वसुली करत असल्याचा मुद्दा चर्चीला गेला होता. आज झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.