लव्ह मॅरेज करणाऱ्यांना घरवापसीचे वेध, शिवसेनेचं जुळणार की सैराट होणार?

महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा (Maharashtra Political Crisis) पुढचा अंक सुरू झालाय. 

Updated: Jul 7, 2022, 10:53 PM IST
 लव्ह मॅरेज करणाऱ्यांना घरवापसीचे वेध, शिवसेनेचं जुळणार की सैराट होणार? title=

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचा (Maharashtra Political Crisis) पुढचा अंक सुरू झालाय. या नव्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे लग्न, घटस्फोट आणि लव्ह मॅरेज. शिवसेना-भाजपच्या लग्नाची पुढची गोष्ट सुरू झालीय. नेमकी काय आहे ही नवी कहाणी, चला पाहूयात. (maharashtra political crisis shiv sena bjp uddhav thackeray devendra fadnvis) 

महाराष्ट्राच्या सत्तानाट्याच्या कहाणीत आता नवा ट्विस्ट आलाय. एका राजकीय लग्नाची पुढची गोष्ट सुरू झालीय. मानपानावरून बिनसलं.आणि तब्बल 25 वर्षांचा शिवसेना-भाजपचा सुखी संसार मोडला. युतीचा काडीमोड झाला. घटस्फोटानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा नवा संसार थाटला. पण हा घरोबा शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे आणि तब्बल 40 आमदारांना पसंत नव्हता. त्यात राष्ट्रवादीचा सासुरवास वाढला. घरखर्चासाठी निधीही मिळेनासा झाला. तेव्हा ज्याची भीती होती, तेच घडलं. शिवसेनेतले हे नाराज बंडखोर पुन्हा एकदा भाजपचा हात धरून सूरतमार्गे गुवाहाटीला पळून गेले.

तिथं त्यांचं पुन्हा एकदा सूत जुळलं. ब्रेक अप के बाद शिवसेना-भाजपनं पुन्हा लव्ह मॅरेज केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. 

आता घरातून पळून जाऊन लव्ह मॅरेज करणाऱ्या शिवसेना आमदारांना पुन्हा घरवापसी करायचीय. पण अडचण आहे ती कुटुंबप्रमुख राजी होतील का नाही, याची. केवळ माहेरच्याच नाही, तर सासरच्या कुटुंबप्रमुखांची देखील मनधरणी करावी लागणाराय. नव्या जोडप्याला आशीर्वाद द्यायचे, तर शिवसेनेतल्या व्याहींना भाजपच्या व्याहींशी तडजोड करावी लागणाराय.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार अजूनही स्वतःला शिवसेनेत असल्याचंच मानतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चर्चेला बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ, अशी भूमिका केसरकरांसह अनेकांनी उघडपणे मांडलीय.. मात्र उद्धव ठाकरेंना आपल्या आजुबाजूचं कोंडाळं आधी दूर करावं लागेल, अशी बंडखोर आमदारांची अट आहे..

संसार नवरा-बायकोचा असो, नाहीतर राजकारणातला. या सुखी संसारात बिब्बा घालण्याचं काम घरातलंच कुणीतरी जवळचं करत असतं. शिवसेना-भाजपच्या लग्नाच्या गोष्टीत ते खापर संजय राऊतांवर फुटतंय. 

शिवसेना-भाजपच्या या लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स काय असेल, याची उत्सूकता आता सगळ्यांना लागलीय. माहेरची मंडळी हे लव्ह मॅरेज मोठ्या मनानं स्वीकारून नव्या संसाराला आशीर्वाद देणार.? की शिवसेनेत सैराट होणार? त्यामुळे पिक्चर तो अभी बाकी है, मेरे दोस्त.