Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जुळून आलं आहे. शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आता एकत्र काम करणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेटी घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज दुपारी मातोश्रीवर दाखल झाले.
प्रादेशिक पक्ष संपण्याचा कट - उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यानंतर पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्ण घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने हातमिळवणी केली असून यापुढे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु असल्याचा आरोप केला. शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो, प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन मोठा इतिहास घडवू असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार आहे.
आपला आजपर्यंतचा इतिहास की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे, पण आपण एकत्र येऊन नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाडून टाकू अशी प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
'लोकशाही आणि संविधान धोक्यात'
महाराष्ट्राचं हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचं ठरवलं असल्याची माहिती यावेळी संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी दिली. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे, त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आलं पाहिजे, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल अशी माहिती मनोज आखरे यांनी दिली आहे.