Rashmi Thackeray : 'वहिनीसाहेब' ठाकरेसेनेला बळ देणार?

रश्मी उद्धव ठाकरे. मातोश्रीवरच्या (Rashmi Thackeray) वहिनीसाहेब. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शिवसेनेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधला वावर वाढलाय.  

Updated: Oct 3, 2022, 11:23 PM IST
Rashmi Thackeray : 'वहिनीसाहेब' ठाकरेसेनेला बळ देणार?  title=

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेचा (Shiv Sena) कसोटीचा काळ सुरू झालाय. अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होतायत. अशावेळी शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी मैदानात कोण उतरलंय, पाहूयात हा रिपोर्ट. (maharashtra political crisis uddhav thackeray wife rashmi thackeray active in social program last few days after eknath shinde rebel) 

रश्मी उद्धव ठाकरे. मातोश्रीवरच्या वहिनीसाहेब. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शिवसेनेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधला वावर वाढलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. अशावेळी शिंदेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात दोनवेळा धडक दिली ती रश्मी वहिनींनी. आनंद दिघेंच्या देवीच्या दर्शनाला जाऊन त्यांनी आरती केली. 

ठाण्याहून परतताना त्या जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांच्या घरी गेल्या आणि कुटुंबीयांची मायेनं विचारपूस केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरवर रश्मी ठाकरेंचा फोटो झळकला. रविवारी शिवसेना भवनातील भवानीदेवीचं दर्शन घेऊन त्यांनी आरती केली. त्यामुळे रश्मी ठाकरेंचा शिवसेनेतला वावर वाढल्याचं स्पष्ट दिसतंय. 

राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झालेल्या फायर आजींच्या भेटीलाही त्या उद्धव ठाकरेंसोबत पोहोचल्या होत्या. मातोश्रीसोबत शिवसेनेचा संवाद तुटल्याचं कारण देत अनेकांनी बंडाचं निशाण फडकवलं. अशावेळी तुटलेला कनेक्ट पुन्हा जुळवण्यासाठी रश्मी ठाकरे सक्रीय होतायत का, असा सवाल उपस्थित होतोय.

रश्मीवहिनी देणार शिवसेनेला नवं बळ?

आजारपणामुळं उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमांमध्ये फारसे सहभागी होत नाहीत. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे एकटे पडण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरेंच्या सहभागामुळं शिवसेनेच्या महिला ब्रिगेडला बळ मिळण्याची आशा आहे. डोंबिवली हे रश्मी ठाकरेंचं माहेर. मुंबई-ठाण्यातील महापालिका निवडणुकीत त्या मोलाची भूमिका पार पाडू शकतात, अशी चर्चा आहे. 

बाळासाहेब ठाकरे असताना माँसाहेब मीनाताईंनी मातोश्रीवरची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. पण आता चारही बाजूनं शिवसेना राजकीय चक्रव्युहात अडकली असताना, केवळ मातोश्रीवर बसून भागणार नाही. बाळासाहेबांची सूनबाई, उद्धव ठाकरेंची खंबीर पत्नी, आदित्य आणि तेजसची मातोश्री आणि शिवसैनिकांची नवी आशा अशा सगळ्याच भूमिका त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यात प्रेक्षकांमध्ये बसणा-या रश्मीवहिनी व्यासपीठावर विराजमान होणार का, याकडं तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.