Maharashtra Politics : बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देखील बहाल केले आहे. यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी रविवारी सकाळी यासंदर्भात एक ट्वीट केले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. "माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते," असे ट्वीट करत संजय राऊत यांनी मोठा दावा केला होता.
माझी खात्रीची माहिती आहे....
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत...
हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b— Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023
"मी अत्यंत खात्रीने बोलत आहे आणि लवकरच पुरावे येतील. जो पक्ष शाखाप्रमुख आणि नगरसेवकालाही विकतघेण्यासाठी 50 लाख रुपये देतात. आमदारांना 50 कोटी तर खासदारांना 100 कोटी देत आहेत, तो पक्ष शिवसेना नाव आणि चिन्ह घेण्यासाठी किती मोठा सौदा करुन बसला असेल याचा हिशोब तु्म्हाला जमणार नाही. माझ्याकडे पक्की माहिती आहे. आतापर्यंत शिवसेना हे नाव आणि चिन्ह विकत घेतले गेले आहे आणि हा न्याय नाहीये हा सौदा आहे. आतापर्यंत यासाठी 2000 कोटी खर्च झाले आहेत. ही माहिती त्यांच्या मित्र परिवारातील बांधकाम व्यावसायिकांनी माझ्याकडे दिली आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
उद्या मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील
"भाजपाला वाटलं तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आत्तापर्यंत चिन्ह आणि नाव २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. २ हजार कोटी ही रक्कम लहान नाही. चार अक्षरांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी हे डील झालं आहे. मी ट्विट करून देशाला ही माहिती दिली आहे. आमच्याकडून आमचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यात आलं आहे त्यासाठी हे एवढं मोठं डील झालं आहे," असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांचे नाव कॅशिअर संजय राऊत ठेवायला पाहिजे
संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हजारो कोटी खर्च केले असा समाजमाध्यमातून आरोप केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "संजय राऊत यांचं नाव आता कॅशिअर संजय राऊत ठेवायला पाहिजे. आजच्या शुभ दिनी संजय राऊत यांनी अभद्र बोलणं योग्य नाही. बाळासाहेब यांचे विचार एकनाथ शिंदे आचरणात आणत आहेत. आपण हरणार हे माहीत होते म्हणून पराभव त्यांनी आधीच मान्य केला असावा," असे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.