Maharashtra Politics : ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिलं होतं. वरळीतून मी आमदारकिचा राजीनामा देतो, मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, कितीही ताकद लावा, यंत्रणा वापरा, तुम्ही कसे निवडून येता ते मी बघतोच अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी ओपन चॅलेंज दिलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतित्तर देत बाळासाहेबांच्या शिवसेनेने (Balasahebanchi Shivsena) आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या ठाण्यातून लढण्याचं प्रतीआव्हान दिलं.
शिंदे गटाचा गौफ्यस्फोट
आव्हान-प्रतिआव्हान सुरु असतानाच शिंदे गटाच्या आमदारांने मोठा गोप्यस्फोट केला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सचिन अहिर (Sachin Ahir) किंवा सुनिल शिंदे (Sunil Shinde) उभे राहू शकतात असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना सर्वच कंटाळले आहेत. तेव्हा सचिन अहिर आणि सुनिल शिंदे कधीही शिंदे गटात येतील असा खळबळजनक दावा शिरसाटांनी केलाय. त्यामुळे मुंबईत आणि खुद्द आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच ठाकरे गटाला खिंडार पडणार का अशी चर्चा सुरु झालीय.
सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या जीवावरच आदित्य ठाकरे वरळीमधून निवडून आले. उद्या सचिन अहिर शिंदे गटात आले तर त्यांचं स्वागतच आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय, शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 2019 मध्ये आदित्य ठाकेर यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं होतं. यावेळी तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांची समजूत काढण्यात आली तर राष्ट्रवादीमध्ये असलेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेत आणलं गेलं.
आदित्य ठाकरे यांचं पुन्हा आव्हान
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरेंनी पुन्हा नवं चॅलेंज दिलंय.. वरळीतून लढण्यास तयार नसाल तर मी ठाण्यातून लढायला तयार आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.. नाशिकमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ते माध्यमांशी बोलत होते... कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत पोटदुखी होणार नाही, तर मविआचाच विजय होईल असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
शिंदे-फडणवीस आज वरळीत
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळीत हजेरी लावणार आहेत. .वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात आज संध्याकाळी सभा होणार आहे. मच्छिमार बांधवांच्या वतीने वरळीत भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानावर आजच्या सभेत शिंदे काय बोलणार, ठाकरेंचे हे आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.