Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची याबाबत वेगळी मतं पाहायला मिळतायत.. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हाच चेहरा असेल, असे स्पष्ट संकेत संजय राऊतांनी दिलेत.
मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचं दबावतंत्र?
सीएमपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोक्याचं ठरेल, लोकांनी उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचं काम पाहिलंय, लोकसभेला ठाकरेंकडे पाहून मतदान झालंय. मविआला लोकसभेतील यश ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम
बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही, असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे.
मविआमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झालेली असताना उद्धव ठाकरेंच्या भाजप (BJP) नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरतोय.. विधानभवनात चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि पेढाही भरवला. विधानभवनाच्या लिफ्टमधून ठाकरे आणि फडणवीसांनी एकत्र प्रवास केला. या गाठीभेटींमधून ठाकरे मविआवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झालीय. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंनीच पडदा टाकला होता.
राजकीय नेत्यांच्या गाटीभेटींमध्ये अनेक अर्थ दडलेले असतात. बऱ्याचदा ते कळायला थोडा वेळ जावा लागतो. भाजपकडून उद्धव ठाकरेंना वारंवार टाळीसाठी दिला जाणारा हात लपून राहिलेला नाहीय. याचा फायदा उद्धव ठाकरे मविआमध्ये बार्गेनिंगसाठी करून घेताना दिसले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे एका दगडात दोन दोन पक्षी मारत आहेत का, हे लवकरच स्पष्ट होईल.
ठाकरे-फडणवीसांचा लिफ्टमधून एकत्र प्रवास
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला तो गाठीभेटींमुळे. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अचानक एकमेकांसमोर आले. विशेष म्हणजे दोघांनीही एकाच लिफ्टमधून प्रवास केला. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आजूबाजूला उभं राहून लिफ्टची वाट पाहत होते. लिफ्ट यायला वेळ लागत असल्यानं दोघांमध्ये थोडासा अनौपचारिक संवादही झाला.
ठाकरे फडणवीसांच्या या लिफ्ट प्रवासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात.