SSC HSC Exam : बातमी इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं लक्ष वेधणारा निर्णय नुकताच राज्यातील शिक्षण मंडळानं घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम भविष्यातील परीक्षांवर होताना दिसणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.
जून- जुलै च्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात ही दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुल्क वाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे याची पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
वाढीव दरानुसार आता इयत्ता दहावीसाठी 440 रुपये तर, बारावीच्या परीक्षेसाठी 550 रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळानं 2017 नंतर परीक्षा शुल्कामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. पण, दरम्यानच्या काळात शिक्षण मंडळाच्या खर्चात वाढ झाल्यामुळं होणारा तोटा नियंत्रणात आणण्यासाठी शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आता वर्षातून दोन वेळा परीक्षा देणं बंधनकारक नसेल असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं होतं. विद्यार्थ्यांवर एका परीक्षेचं असणारं दडपण कमी करण्यासाठी वर्षातून दोनदा बोर्ड आणि प्रीबोर्ड अशा परीक्षा घेतल्या जाणार असून, सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा बंधनकारक नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, फेब्रुवारी - मार्च 2024 मध्ये होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांसाठीची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा 21 ते 23 मार्च दरम्यान पार पडणार आहे. तर, दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत पार पडणार आहे.