मुंबई : एसटी कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घ्या असे आवाहन करताना दिवाळीच्या सणात तुमच्या अन्नदात्यांचे हाल करु नका, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा, अशी साद परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घातली. दरम्यान, संपाला गालबोट लागलेय.
अहमदनगर जिल्ह्यात एसटी. कर्मचारी संप सुरु असताना अकोले आगारातील सहभागी वाहक एकनाथ विठ्ठल वाकचौरे(५२), रा. वडगाव पान, ता. संगमनेर यांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे संपाचा एक जण बळी गेलाय.
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी बुधवारी दुसऱ्या दिवशीही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. या संपामुळे राज्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. काही ठिकाणी पर्यटक अडकलेत. तर काहींना बस स्थानकात तिष्ठत उभे राहावे लागले.
ऐन दिवाळीत संप सुरु असल्याने दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अशात मंगळवारी सरकारचा कामावर हजर होण्याचा अल्टीमेटम कर्मचाऱ्यांनी धुडकावून लावला. त्यामुळे आजही प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम आहेत. दरम्यान, सकाळी झालेल्या चर्चेत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरुच आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा एसटी बस आगारात कर्मचाऱ्यांनी संप काळात आगळंवेगळं आंदोलन केलं. भजन, भारुड तसंच कव्वाली सादर करून कर्मचा-यांनी सरकार विरोधात प्रदर्शन केलं. काही ठिकाणी परराज्यातल्या एसटी बसची तोडफोड करुन हवा काढून घेण्याचे प्रकार घडत असताना, चोपडा आगारातल्या कर्मचा-यांच्या केलेल्या या हटके आंदोलनानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले.
नाशिक जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्यासोबत शिर्डी सापुतारा आशा बाजूच्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. त्यामुळे एसटीच्या संपाचा फटका एसटी मंडळासोबत अनेक व्यवसायांना आणि पर्यटकाना बसला आहे.