उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईत बॅनर लावलण्यात आहे आहेत, या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.

राजीव कासले | Updated: Jul 27, 2023, 02:11 PM IST
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर title=

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पण यातही कलानगर परिसरात मातोश्रीबाहेर लावण्यात आलेले बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उद्धव ठाकरेंचा उल्लेख भावी पंतप्रधान (Future Prime Minister) असा करणारी पोस्टर्स मुंबईत कलानगर परिसरात लागली आहेत. या पोस्टर्सवर संयमी नेतृत्व, भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातही अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेत. देश हेच माझे कुटुंब असं या बॅनरवर लिहिल्याचं दिसून येतंय. शहरात या बॅनरची चर्चा रंगलीये.

ठाकरे गट 'इंडिया'त सहभागी
केंद्रातील एनडीएची सत्ता खाली खेचण्याठी देशातील प्रमुख 26 पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली असून याला I.N.D.I.A असं नाव दिलं आहे. ठाकरे गटही या आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे राज्यासह केंद्रातील भाजप सरकारविरोधातली धार आणखी आक्रमक करण्याचा प्रयत्न ठाकरे गट करणआर आहे. पण पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विरोधकांनी अद्याप पंतप्रधानपदाचा चेहरा दिला नसताना उद्धव ठाकरेंचे भावी पंतप्रधान म्हणून बॅनर झकळल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

आवाज कुणाचा - उद्धव ठाकरेंची मुलाखत
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आला. यात त्यांनी केंद्र आणि शिंदे-फडणवीस-पवार गटावर जोरदार टीका केली आहे. जनसंघाची एक घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान. आता त्याच्यात त्यांनी जोडलंय 'एकच पक्ष'. जे मी आणि जनता कदापी मान्य करू शकत नाही. देश एक मान्य. एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 
 
मोदी म्हणताहेत ना की परिवार वाचवणारे सगळे विरोधक तिकडे एकत्र आले आहेत. मग तुम्ही सत्ता वाचवायला एकत्र आलात का? जसं बंगळुरूला परिवार वाचवण्यासाठी ही लोकं एकत्र आली असं त्यांचं म्हणणं आहे. मी ठामपणे म्हणतो, होय... परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोत. माझा देश माझा परिवार आहे. हेच माझं हिंदुत्व आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही संकल्पना मी कोविड काळात राबवली होती. तीच आज देशभरात राबवण्याची वेळ आली आहे, की 'माझा देश माझी जबाबदारी' आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 
 
मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे आमने-सामने करणारा मी आहे. जशास तसं उत्तर देणारा मी आहे. 'अरे' ला 'कारे' करणारा आहे. त्यामुळे मी लढतोय. महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचंच रूपांतर आता देशभरात 'इंडिया' नावानं झालंय म्हणून इतर राज्यांतले जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यात काँग्रेस मोठा पक्ष आहेच, इतर पक्ष त्यात सामील झाले आहेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.