Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर? आचारसंहितेपासून निकालापर्यंतच्या तारखांचीच चर्चा

Vidhan Sabha Election 2024 : गणपती, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी... दिवाळीनंतरच फुटणार राजकीय फटाके. पाहा कोणता पक्ष करणार धमाका...  

सायली पाटील | Updated: Aug 13, 2024, 08:27 AM IST
Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर? आचारसंहितेपासून निकालापर्यंतच्या तारखांचीच चर्चा  title=
Maharashtra vidhan sabha election 2024 date results before diwali latest update in marathi

Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकाराणाला खरी कलाटणी मिळाली ती म्हणजे 2424 मधील लोकसभा (Loksabha election 2024) निवडणुकीदरम्यान. राज्यात महायुतीला मिळालेल्या दणक्यानंतर आणि मविआनं मारलेल्या मुसंडीनंतर विधानसभा निवडणुकीत नेमकी काय परिस्थिती असेल याचीच उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. ही उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच (Diwali 2024) होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. या माहितीची तपशील पाहता नवीन विधानसभा 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यास साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागण्याची सार्वत्रिक शक्यता वर्तवली जात आहे. 

सप्टेंबर की ऑक्टोबर अशी चर्चा सुरू असतानाच आता विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच लगेचच पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नियमानुसार नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. 

हेसुद्धा वाचा : महायुतीची 'लाडकी बहिण', तर काँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना... महिलांच्या योजनांवरून कलगीतुरा

 

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पावसाचे दिवस पाहता यादरम्यान आचारसंहिता आणि प्रचाराचा धुरळा ही सर्व परिस्थिती टाळण्यासाठी आता थेट दिवाळीनंतरच निवडणूक घेण्यावर (Election Commission) निवडणूक आयोग विचार करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

सध्याचा काळ प्रचारासाठी पूरक नाही 

राज्यात सध्या पावसाचे दिवस सुरू असून, सध्याचा काळ हा पावसासाठी पूरक नसल्याचंच एकंदर चित्र आणि नेतेमंडळींचा सूर पाहायला मिलत आहे. परिणामी सणासुदीच्या दिवसांणध्ये निवडणुकीची रणधुमाळी योग्य नसून हे सर्व नियोजन दिवाळीनंतरच करावं असा सूर सध्या सत्तेच्या चाव्या हाती असणाऱ्या महायुतीकडूनही आळवला जात आहे, अर्थात त्यासंदर्भातील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. 

कधी आहे दिवाळी? 

28 ऑक्टोबरपासून वसुबारस आणि त्यानंतर दिवाळीला प्रारंभ होत असून, 4 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीचीच धामधूम असणार आहे. त्यानंतर लगेचच निवडणुका पार पडणार का? हाच महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. असं झाल्यास निवडणुकीचा निकाल साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबरला लागू शकतो. 45 दिवसांनी नवी विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित असल्यामुळं 26 नोव्हेंबरपूर्वी 45 दिवस आधी म्हणजे 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू होऊन अतिशय वेगानं विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्याचे संकेत आहेत. तेव्हा आता निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा केव्हा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.