Maharashtra Weather News : संपूर्ण देशात मान्सून सक्रिय असतानाच महाराष्ट्रात मात्र काही भागांमध्ये सध्याच्या घडीला पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बहुतांश भागांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 27° सेल्शिअस इतकं असेल.
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मात्र अधूनमधून येणाऱ्या पावसामुळं अडचणी काहीशा वाढण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी लारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. सध्या मध्य प्रदेशाच्या वायव्येपासून अरबी समुद्रापर्यंतच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ज्यामुळं मध्य भारतामध्ये मान्सूनची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या पावसाच्या धर्तीवर कुठेही रेड अलर्ट लागू नसून गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर भागांमध्ये मात्र पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Latest nowcast warning over the country issued for next 2-3 hours. For details kindly visit: https://t.co/OCn8AyHdIg pic.twitter.com/gJw8nQHQeW
— India Meteorological Department (@Indiametdept) August 12, 2024
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के एस होसाळीकर यांच्या माहितीनुसार राज्यात आधी नमूद केल्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत पाऊस कमी राहील. 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. महिना अखेरीपर्यंत पावसाचं हेच सत्र सुरू राहणार असून, राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29% जास्त पाऊस झाला आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला संपूर्ण भारतात मान्सून सक्रिय असून, मान्सूनचा प्रभाव असणारी एक प्रणाली पूर्वोत्तर बंगालमध्ये सक्रिय असून, तिची स्थिती सामान्य आहे. ज्यामुळं देशाच्या मध्यापासून उत्तरेकडे पावसाचं प्रमाण जास्त पाहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही भागांना पाऊस अधिक धडकी भरवताना दिसेल तर, राजस्थानच्या काही भागांमध्येही त्याची जोरदार हजेरी असेल. देशाच्या किमान तापमानाच यादरम्यान चढ- उतार पाहायला मिळणार आहेत.