Maharashtra Weather Update : मान्सूनचे दिवस उजाडले असले तरीही हा मान्सून अपेक्षित प्रमाणात राज्यात सक्रिय झालेला नाही ही वस्तुस्थिती आता अनेकांनीच स्वीकारली आहे. काहीसा उशिरानं का असेना पण केरळात दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या तळ कोकण भागात आला. पण, बिपरजॉय चक्रिवादळामुळं त्याचा वेग मात्र काहीसा मंदावला आणि इथं मुंबईसह राजच्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा वाढतच राहिला.
मागील काही दिवसांपासून मधूनच येणारी एखादी पावसाची सर आणि दिवसभरातील उन्हाचा तडाखा यामुळं हवेतील आर्द्रतेचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. परिणामी तापमानाचा दाह 2 ते 3 अंशांनी अधिक असल्याचं भासत आहे. मंगळवारी नागपुरात पारा 41 अंशांवर पोहोचला होता. तर, कोल्हापुरात हा आकडा 32 अंशांवर स्थिरावला. मुंबईतील तापमान 33 अंश असूनही उष्णतेचा दाह मात्र 35 ते 37 अंशांइतका जाणवत होता. ज्यामुळं गेला मान्सून कुणीकडे? हाच प्रश्न अनेकांनी विचारण्यास सुरुवात केली.
आयएमडी पुणेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, विदर्भात मात्र तापमान वाढलेलंच असेल. काही भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरु असेल.
पुण्याचं सांगावं तर, तिथं आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, काही भागांना पाऊस झोडपेल. तिथे चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली भागाची मात्र उन्हाळ्यापासून इतक्याच सुटका नाहीच.
दरम्यान, खासगी हवमान संस्था Skymet च्या अंदाजानुसार येत्या काळात देशातील काही भागांमध्ये मात्र पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ओडिशाचा दक्षिण भाग, झारखंड, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबर द्वीप समुहातही पाऊस वातावरणात गारवा आणणार आहे. राजस्थानसह देशाच्या काही भागांमध्ये मात्र धुळीचं वादळ आणि उष्णतेची सौम्य लाटही येऊ शकते. त्यामुळं तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतुंची तयारी करूनच बाहेर पडा.