उत्तर भारत गारठला; राज्यात मात्र अंशत: तापमान वाढ; थंडी चकवा देण्याच्या तयारीत?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वातावरण बदलांमध्ये आता राज्यात तापमानवाढ होताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Dec 28, 2023, 07:06 AM IST
उत्तर भारत गारठला; राज्यात मात्र अंशत: तापमान वाढ; थंडी चकवा देण्याच्या तयारीत?  title=
Maharashtra weather news temprature might increase cold wave in north india

Maharashtra Weather News : भारतातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये हाडं गोठवणारी थंडी पडलेली असतानाच इथं महाराष्ट्रात हवामानात काहीसे बदल झाल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात काही अंशांनी वाढ झाल्यामुळं थंडी कमी झाल्याचं लक्षात येत आहे. मागील काही दिवसांपासून जिथं परभणी, निफाडसारख्या भागांसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी होतं तिथंच आता मात्र फक्त धुळ्यातच तापमान 10 अंशांखाली असून उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. 

सध्याच्या घडीला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्याच्या कोकण, सातारा पट्ट्यात थंडीचं प्रमाण कमी झाल्याचं लक्षात येत आहे. तर, मुंबईमध्येसुद्धा सकाळच्या वेळी उन्हाच्या झळांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईमध्येसुद्धा चित्र वेगळं नाही. या साऱ्यामध्ये शहरातील धुरकं वाढत असल्यामुळं दृश्यमानतेवर याचा परिणाम होत आहे. ज्यामुळं नागरिकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 

उत्तर भारतावर धुक्याची चादर... 

इथं मुंबई- दिल्लीसारख्या शहरांवर धुरक्याचा विळखा असतानाच तिथं उत्तर भारतामध्ये मात्र सर्वत्र दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. सूर्य डोक्यावर आल्यानंतरही हे धुकं कायम असल्यामुळं या भागांमधील वाहतुकीवर याचा थेट परिणाम होत आहे. 

'स्कायमेट' (Skymet) या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशामध्ये धुकं कायम राहणार आहे. तर, ओडिसा आणि झारखंडवरही धुक्याची हलकी चादर पाहायला मिळणार आहे. देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूवर मात्र पावसाचं सावट असेल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x