Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. मराठवाड्यापासून विदर्भ आणि कोकणासह मुंबईतही उन्हाच्या झळांनी नागरिक बेजार झाले. पण, त्यातच काही ठिकाणी मात्र पावसाच्या सरींनी अनपेक्षित हजेरी लावली. ज्यामुळं क्षणार्धासाठी हवामानात बदल झाले खरे, पण त्यानंतरही उष्णता आणखी वाढली. राज्यातील तापमानाच वाढ होण्याचं हे सत्र सुरु असतानाच पहाटेच्या वेळी आणि रात्री उशिरानं थंडीची चाहूलही आता हिवाळा जवळ येत असल्याची साद घालताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात येते काही दिवस हेच चित्र दिसू शकतं.
तिथं देशात राजस्थान आणि हरियाणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण धाली असून, अंदमानपासून श्रीलंकेपर्यंत पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. अरबी समुद्रात 21 ऑक्टोबरला 'तेज' चक्रिवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळं याचे परिणाम मुंबई, पालघर भागांमध्ये दिसून येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असतानाच राज्यातून आणि देशातूनही पावसानं काढता पाय घेतलेला असताना वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळं पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या मुंबई, कोकण पट्ट्यामध्ये तापमानाचा आकडा 33 ते 35 अंशांवर असेल तर, अकोला आणि सोलापूर भागात हाच आकडा 36 अंशावर असू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सध्या ईशान्य आणि पूर्व भारतातून मान्सूननं पूर्णपणे माघार घेतली आहे. तर, तिथं तेलंगणा आणि केरळातूनही मान्सून माघारी फिरला असला तरीही चक्रिवादळामुळं तयार झालेल्या परिस्थितीमुळं इथं पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांसह पंजाब, राजस्थान भागातही तापमानाचा आकडा काही अंशी कमी होताना दिसेल. काश्मीरच्या खोऱ्यासह हिमाचलच्याही पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होणार असल्यामुळं स्थानिक आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर, लडाख भागामध्ये थंडीचा तडाखा सातत्यानं वाढताना दिसणार आहे.