अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : जालन्याच्या अंबड येथील एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी प्रेक्षाभक भाषण केल्याचा आरोप केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता भुजबळांवर आणखी एक मोठा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार होत्या. मात्र कारने छगन भुजबळांच्या घराच्या दिशेनं जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळांवर गंभीर आरोप केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या सांताक्रुज येथील खाजगी बंगला हा फर्नांडिस कुटुंबीयांची जागा हडपून बांधण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा अंजली दमानिया यांनी केला आहे. या वेळी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत फर्नांडिस कुटुंबीयांना समोर आणलं आणि त्यांची कशी फसवणूक केली याची माहिती दिली. फर्नांडिस कुटुंबीयांपैकी डॉरीन फर्नांडिस यांची तीनही मुलं म्हणजे फ्रान्स, सेव्हिओ आणि नोबेल ही गतिमंद आहेत. सध्या ती बांद्रा येथे राहण्यास आहेत. साडेआठ कोटी रुपये हे समीर भुजबळ या कुटुंबीयांना या जागेच्या बदल्यात देणार होते. मात्र अद्यापही भुजबळांनी त्यांना पैसे दिलेले नाहीत असा आरोप अंजली दमानिया यांचा आहे.
अंजली दमानिया यांनी यासंदर्भात सुप्रिया सुळे यांच्याशी देखील मधल्या काळात चर्चा केल्याचा सांगितलं. ज्यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप ग्रुप बनवून समीर भुजबळ आणि फर्नांडिस कुटुंबीयांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असं अंजली दमानिया यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील या संदर्भात पाठपुरावा केला परंतु अजूनही मुलांना त्यांच्या हक्काच्या जागेसाठी हेलपाटे घालावे लागत असल्यामुळे त्यांची झालेली परिस्थिती सांगताना अंजली दमानिया भाऊक झाल्या. जालन्याच्या सभेत जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या छगन भुजबळ यांनी स्वतः काय केलं असा सवाल करत 48 तासात फर्नांडिस कुटुंबीयांना त्यांचे पैसे द्या नाहीतर सोमवारपासून छगन भुजबळ यांच्या सांताक्रुज येथील खाजगी घरासमोर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी उभी राहणार असल्याचा इशाराच अंजली दमानिया यांनी दिला आहे.
छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप
छगन भुजबळ यांचा सांताक्रुज येथील खाजगी निवासस्थान हे त्यांचे हडप केलेलं निवासस्थान आहे. फर्नांडिस कुटुंबीयांची ही मूळची जागा आहे. फर्नांडिस कुटुंबीयांचा बंगला रहेजा बिल्डरने 2003 मध्ये डेव्हलपमेंट साठी घेतला होता. फर्नांडिस यांची जागाही रहेजा बिल्डर कडून डेव्हलपमेंट साठी घेण्यात आली आणि परस्पर ही जागा समीर भुजबळ यांच्या परवेज कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आली असल्याचा आरोप अंजली दमानिया करत आहेत.
अंजली दमानिया यांनी यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना देखील फोन केला होता. त्यांनी तातडीने माणूस पाठवून चौकशी केली होती. 2023 म्हणजे यावर्षीच्या जानेवारी महिन्यात साडेआठ कोटी देतो असं सांगितलं होतं परंतु आतापर्यंत फर्नांडिस कुटुंबाला काहीच मिळालं नाही. याचा पाठपुरावा करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप ग्रुप सुद्धा तयार केला होता असे अंजली दमानिया सांगतात. ईडीने प्रॉपर्टी जप्त केली असं समीर भुजबळ यांनी सांगितलं आणि आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नाही असं म्हणाले, असे दमानिया यांनी सांगितले.
अंजली दमानिया यांनी या 6 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत बंगल्यावर भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भात कळवले असे सांगितले. 48 तासात भुजबळ यांनी पैसे दिले तर मी स्वतःहून आभार मानेन नाहीतर या परिवारासह सोमवारी त्यांच्या घरासमोर जाऊन बसू असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.