महाविकास आघाडीचं इंटेलिजन्स फेल, पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे सूरतला?

इतक्या मोठ्या राजकीय घडामोडीची कुणकुण गृहविभागाला का नव्हती?

Updated: Jun 21, 2022, 06:57 PM IST
महाविकास आघाडीचं इंटेलिजन्स फेल, पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे सूरतला? title=

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपासंदर्भात मोठी बातमी. शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) इंटेलिजन्स फेल झाल्याचा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

पोलीस बंदोबस्तात शिंदे सूरतला
पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबई सूरत रस्त्याने गुजरातपर्यंत पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा एकनाथ शिंदे यांना होती. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार सूरतला रवाला झाले. 

विशेष म्हणजे इतकी मोठी घडामोड घडत असताना याची कल्पना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे गृहखात्याच्या कारभारावर आता प्रश्न उपस्थित होत आहे. 

नाशिकमधून पलायनाचं नियोजन?
दरम्यान, राजकीय भूकंपाआधी एकनाथ शिंदेंसह नाशिकमधूनच आमदारांचं पलायनाचं नियोजन होतं अशी माहिती समोर आलीय. एका खासगी उद्योगपतीचं विमान त्यासाठी नाशिकला काही मिनिटांसाठी थांबणार होतं. नाशिकच्या विमानतळावर खासगी बिझनेस क्लास विमान येणार होतं. मात्र मध्यरात्री मुंबईतूनच अचानक आमदार थेट गुजरातला रवाना झाले. 
 
शिवसेनेतलं आतापर्यंतच सर्वात मोठं बंड

शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.