कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: घाटकोपर पश्चिम येथील भटवाडीमधील सार्वजनिक शौचालय बिल्डरच्या फायद्यासाठी तोडले जात आहे. यामुळे येथील राहिवाशांना त्रास होणार असल्याने शौचालय तोडू नये, या मागणीसाठी घाटकोपर पश्चिम येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील राम जोशी मार्ग येथे माता महाकाली सेवा मंडळ या ठिकाणी सरकारी मालकीच्या जागेवर ३८ आसनी शौचालय आहे. त्याचा वापर येथील एक हजार ते दीड हजार नागरिक या शौचालयाचा वापर करतात. अशावेळी हे शौचालय तोडल्यास विभागातील नागरिकांना पर्याय सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होईल.
विभागातील लोकसंख्या बघितली असता आहे ते शौचालय नागरिकांना अपुरे पडते. या संदर्भात चार वर्षापासून उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चा या लोकशाही पद्धतीने आंदोलन करूनही महानगरपालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार सुदाम शिंदे यांनी केली.
महानगरपालिका एन विभागातील सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे व परिमंडळ - ६ चे उपायुक्त ढाकणे या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बिल्डर व अधिकारी यांचा संगनमताने शौचालय तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी हे शौचालय चांगले असल्याचा अहवाल दिला असताना सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे त्या अहवालाकडे दुर्लक्ष केले. शौचालय तोडण्यासाठी नवीन पर्याय शोधून त्या जागेवर इमारत बांधण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप सुदाम शिंदे यांनी केला आहे.
याबाबत पालिका आयुक्तांपासून राज्यपालांपर्यंत तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शिंदे यांनी मुख्यालयात एका बॉटलमधून रॉकेल आणून आपल्या अंगावर ओतून घेत असतानाच त्याला पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी पकडून आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.