१ डिसेंबरचा जल्लोष ही निव्वळ फसवणूक- धनंजय मुंडे

अधिवेशनाचा केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

Updated: Nov 22, 2018, 08:29 PM IST
१ डिसेंबरचा जल्लोष ही निव्वळ फसवणूक- धनंजय मुंडे title=

मुंबई: येत्या १ डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला केलेले आवाहन म्हणजे निव्वळ फसवणूक असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या वैधानिक अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीबाबत काही शंका उपस्थित केल्या. 

राज्य शासनाने गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याची अधिसूचना काढली. मात्र, आता अधिवेशनाचा केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ही समिती तज्ज्ञांना आमंत्रित कधी करणार आणि पुढील निर्णय कधी घेणार, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. 

ही संपूर्ण परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांची १ डिसेंबरला जल्लोष करण्याची घोषणा म्हणजे निव्वळ फसवणूक असल्याची टीकाही धनंजय मुंडे यांनी केली. 

तत्पूर्वी सरकारने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात न मांडल्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली. राज्यातील विधानसभेचे २८८ आणि परिषदेचे ७८ आमदारांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. मात्र, सभागृहात अजून अहवाल मांडलेला नाही. त्यामुळे अहवालात काय आहे हे माहीत नसल्यामुळे काय भूमिका मांडायची हा सर्वच आमदारांपुढे प्रश्न होता. अहवालावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर आमदार बैठकीला येतील, अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतली.